वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे 13 ते 29 जानेवारी दरम्यान होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता विद्यमान विजेत्या बेल्जियम हॉकी संघाचे शुक्रवारी येथे आगमन झाले.
बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी बेल्जियम संघाचे आगमन झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी या संघाचे जोरदार स्वागत केले. विमानतळावर हॉकीशौकीन मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विद्यमान विजेता बेल्जियम संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 14 जानेवारीला भुवनेश्वरमध्ये कोरियाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत बेल्जियम संघ ब गटात असून या गटात जर्मनी, जपान आणि कोरिया यांचाही समावेश आहे. बेल्जियम संघाचे नेतृत्व फेलिक्स डिनायर करीत आहे. बेल्जियम पुन्हा या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून विश्वचषक स्वतःकडे राखेल, असा विश्वास कर्णधार डिनायरने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेरडेशनच्या 2018 साली झालेल्या. पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत बेल्जियमने विजेतेपद मिळवले होते. आतापर्यंत विश्वचषक हॉकी चषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या संघांनी सलग दोनवेळा जेतेपद मिळवण्याचा विक्रम केला आहे. पाकिस्तानने 1978 आणि 1982, जर्मनीने 2002 आणि 2006 तर ऑस्ट्रेलियाने 2010 आणि 2014 साली ही स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेपूर्वी बेल्जियम संघाचे स्पेनमध्ये खास सरावाचे शिबीर आयोजित केले होते. या सराव शिबिरामध्ये बेल्जियमने सर्व म्हणजे चारही सामने जिंकले आहेत. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, नेदरलँडस्, जर्मनी आणि आपल्या मायदेशात नेहमीच यजमान भारत हे जेतेपदाच्या शर्यतीत राहतील असे बेल्जियमच्या कर्णधाराने म्हटले आहे. यावेळी भारतात होणाऱया या स्पर्धेत इंग्लंड आणि अर्जेंटिना या संघाना कमी लेखून चालणार नाही. बेल्जियम हॉकी संघाला अनुभवी प्रशिक्षक शेन मॅक्लोड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या संघामध्ये अनेक अनुभवी हॉकीपटूंचा समावेश आहे. या संघातील एक अनुभवी आणि ज्येष्ठ जॉन डुमेन याने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक हॉकी कारकीर्दीत 400 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या बेल्जियमच्या संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे समतोल मिश्रण ठेवण्यात आले आहे.









