पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी अफगाणिस्तान सीमेवरील शोध मोहिमेदरम्यान 2 आत्मघाती हल्लेखोरांसह 11 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण वझिरिस्तानच्या वाना जिल्हा मुख्यालयात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना हे यश मिळाले. यावेळी कमांडर हफिजुल्ला तोरे उर्फ तोरे हाफिजही मारला गेल्याचे सांगण्यात आले. या कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मोठय़ा हाय-प्रोफाइल दहशतवादी कारवाया हाणून पाडल्या आहेत.
सुरक्षा दलांनी 11 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी ठार केलेले दहशतवादी लष्कर आणि पोलिसांविरुद्धच्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होते. दुसरीकडे, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला तेहरीक-ए-तालिबान म्हणजेच टीटीपी या दहशतवादी संघटनेकडूनही कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. टीटीपी सातत्याने तेथे दहशतवादी हल्ले करून पाकिस्तानच्या अडचणी वाढवत आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर टीटीपी अधिक शक्तिशाली झाली आहे. अफगाणिस्तानला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वामध्ये सुमारे 7 ते 10 हजार दहशतवादी कार्यरत असल्याचा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी केला आहे.









