सुमारे दोन महिन्यांपूर्वी टाटा उद्योग समूहाने धातू उद्योग क्षेत्रातील आपल्या 6 कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण करण्याचा मोठा, धाडसी व दूरगामी स्वरुपाचा निर्णय घेतला. या निर्णयाची पूर्वतयारी व नियोजन व्यापक स्वरुपात व मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली. एवढय़ा मोठय़ा निर्णयाचा फारसा गाजावाजा नव्हता. प्रामाणिक साधेपणा व परिश्रमासह सातत्यपूर्ण प्रयत्न याचाच यानिमित्ताने पुन्हा संपूर्ण उद्योग विश्वाला नव्याने परिचय तर झालाच व टाटा उद्योग समूहाच्या पूरक वा विपरित परिस्थितीतील यशोगाथांचा आढावा यानिमित्ताने अवश्य घेण्यासारखा आहे.
टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांच्या मते, परिश्रमांसह साधेपणा व सातत्य या बाबी संपूर्ण समूहासाठी समान महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या मते काही वर्षांपूर्वी टाटा उद्योग समुहातील कंपन्यांची संख्या शंभरीच्या घरात होती. या कंपन्या व्यावसायिक संदर्भात हवाई वाहतूक, वाहन उद्योग व सुटे भाग, ग्राहकोपयोगी सेवा, चहा उत्पादन, संगणक सेवा, स्टील उद्योग, मोठे हॉटेल्स, उर्जा व संरक्षण उत्पादन या क्षेत्रात कार्यरत होत्या.
यातील काही कंपन्या तर टाटा समूहात असतानासुद्धा एकाहून अधिक कंपन्या एकाच व्यवसाय क्षेत्रात काम करीत असल्याचे चित्र त्यातून निर्माण होत असे. यामध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाली. 2016मध्ये त्यावेळी चंद्रशेखरन यांच्या टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरील नेमणुकीपासून 154 वर्षांचा प्रदीर्घ व्यवसाय इतिहासाची परंपरा असणाऱया टाटा उद्योग समुहाच्या इतिहासात चंद्रशेखरन हे तिसरे गैर टाटा अध्यक्ष ठरले आहेत हे विशेष.
नव्याने करण्यात आलेल्या व्यावसायिक व व्यवस्थापन पर बदलांनंतर टाटा उद्योग समुहातील उद्योगांची संख्या आता 30 वर आली आहे. या उद्योगांची विभागणी मुख्यतः तंत्रज्ञान, स्टील, मुलभूत सुविधा-बांधकाम, वित्तीय सेवा, हवाई वाहतूक व संरक्षण उत्पादन, पर्यटन व्यवसाय, दूरसंचार व प्रसार माध्यम या व्यावसायिक कंपन्यांमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी विशेष नियोजन व धोरणाची आखणी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे झालेले परिणाम व फायदे आता दृश्य स्वरुपात दिसून येत आहेत. प्रामुख्याने व टाटा स्टील कंपनीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे मार्च 2022 पर्यंत टाटा स्टील ही जागतिक स्तरावर दहावी मोठी कंपनी होती. कंपनीने मुख्यतः 2018 मध्ये भूषण स्टील, 2019 मध्ये उषा मार्टिन तर 2022 मध्ये निलांचल इस्पात या सारख्या कंपन्यांचे अधिग्रहण केले. यातून टाटा स्टीलला व्यावसायिक विस्तार व आर्थिक फायदे असे दुहेरी लाभ झाले.
याशिवाय कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, वाहतूक व व्यवस्थापन खर्च यामध्ये सुद्धा मोठे लाभ होत गेले. यामध्ये स्टील उत्पादन व प्रक्रियेसाठी आवश्यक खनिज पदार्थ, भंगाराचा वापर, वाहतूक खर्च, व्यावसायिक बोली वा निर्णयांमध्ये सुसूत्रता, कर्मचाऱयांचा अधिक प्रभावी व सक्षम उपयोग, आर्थिक नियोजन, कार्यालयीन व प्रशासकीय खर्चात सुसूत्रता या मुख्य फायद्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सकृतदर्शनी या फायद्यापोटी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सकृतदर्शनी या फायद्यांपोटी होणारी आर्थिक बचत सुमारे 2000 कोटी असेल.
तसे पाहता गेली काही वर्षे टाटा समुहांतर्गत उद्योगांच्या एकीकरणावर भर दिलेला दिसून येतो. टाटा केमिकल्सच्या संदर्भात सांगायचे म्हणजे त्याठिकाणी डाळ व मसाले उत्पादनावर विशेष भर देण्यात आल्याचे दिसून येते. आता टाटा केमिकल्स अंतर्गत ग्राहकोपयोगी खाद्य उत्पादन व्यवसायाचे आता टाटा ग्लोबल व्रिवरेजेसमध्ये विलीनीकरण करून टाटा कंझ्युमर्स प्रॉडक्शन या नव्या कंपनीचा व्यवसाय सुरू झाला आहे. या वर्षीच्या सुरुवातीला टाटा कॉफी आणि टाटा स्मार्ट फुडस् या टाटा कंपन्यांची व्यवस्थापकीय फेररचना केली गेली.
टाटा कंपन्यांच्या या फेररचना व नव्या व्यवस्थापन रचनेचे दृश्य परिणाम आता दिसायला लागले आहेत. उदाहरणार्थ 2016-18 या आर्थिक वर्षात 889 कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल असणाऱया टाटा कंझ्युमर्स प्रॉडक्ट या कंपनीची 31 मार्च 2022 रोजीची उलाढाल होती 12425 कोटी. फेररचनेतून व्यवसाय प्रगती हे नवे सूत्र यानिमित्ताने स्पष्ट झाले.
व्यवस्थापनाच्या संदर्भात सांगायचे म्हणजे नव्या व्यवस्थापकीय बदलांमुळे टाटा कंपन्यांमध्ये नव्याने व परिणामकारक सुसूत्रता आलेली स्पष्ट होते. नव्या व्यवस्थापनांतर्गत परस्परांना पूरक अशी सकारात्मक सहकार्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात टाटा मोटर्स व टाटा पॉवर्स या कंपन्यांच्या व्यावसायिक कार्यक्षमतेचा दाखला दिला जातो.
टाटा मोटर्स व टाटा पॉवर्सचा व्यवसाय पाहता टाटा मोटर्स वाहन निर्मिती तर टाटा पॉवर्स ऊर्जा निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. नव्या विजेवर चालणाऱया वाहनांची निर्मिती व त्यांना आवश्यक असा विद्युत पुरवठा या व्यावसायिक बाबी या दोन्ही कंपन्यांसाठी समानसूत्र ठरल्या. बदलती व्यावसायिक स्थिती, धोरणात्मक निर्णय व वाढत्या स्पर्धेवर मात करण्यासाठी या नव्या धोरण निर्णयांचा उभय टाटा कंपन्यांना फायदा होत आहे. या दोन्ही कंपन्या व्यावसायिकच नव्हे तर भौगोलिक संदर्भात पण इलेक्ट्रीक वाहनांची नेमकी गरज व वाढता व्यवसाय लक्षात घेऊन आपल्या उत्पादन विक्री, सेवा व ग्राहक विस्तार यांचा एकत्रित व सामूहिक विचार करू लागल्या आहेत. अन्य मुख्य उदाहरण म्हणजे 2019 मध्ये टाटा समुहातील टाटा सन्सने डिजिटल व्यवसायाला नवी दिशा व गती देण्यासाठी टाटा डिजिटल कंपनीची स्थापना केली. नंतरच्या अल्पावधीतच टाटा डिजिटलने आपल्या कामाची जोमदार सुरुवात केली असून 2021 मधील बिग बास्केटच्या अधिग्रहणानंतर या नव्या कंपनीला मोठे पाठबळ लाभले. यामध्ये स्वतः रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील युरोपमधील कोरोस स्टील, इंग्लंडमधील टेटली टी व जग्वार लँड रोवर यांचा प्रामुख्याने समावेश केला जाईल. याशिवाय भारतातील इंडियन हॉटेल्सचा विविध देशांमधील विस्तार, टाटा कन्सल्टन्सीचा विदेशातील नव्या शाखा या व्यावसायिक वाढीचा प्रामुख्याने समावेश करता येईल. याशिवाय टायटन या आभूषण बनविणाऱया टाटा कंपनीने अनिवासी भारतीयांना भारतीय आभूषणांची भुरळ घालतांनाच टायटनने आखाती देशांसह कॅनडा, अमेरिकेत आपला विस्तार केला आहे.
टाटांचे विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठे व नव्यानेच केलेले व्यावसायिक उड्डाण म्हणून एअर इंडियाच्या नव्या व्यवसायिक श्रीगणेशाचा उल्लेख करावा लागेल. टाटा है, तो मुमकीन है असा नवा विश्वास या संदर्भात व्यक्त केला जात आहे.
दत्तात्रय आंबुलकर








