पृथ्वीचा जीवनदाता असणाऱया सूर्यावर काही दिवसांपूर्वी एक महाप्रचंड स्फोट झाल्याचे दिसून आले आहे. अवकाश संशोधकांनी या स्फोटाची दिलेली माहिती सर्वसामान्यांना अवाक् करणारी आहे. दुसऱया महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानवर टाकलेल्या दोन अत्यंत प्राथमिक स्वरुपात अणुबॉम्बमुळे केवढा विनाश घडला होता, याची आठवण आजही आपल्याला भयावह वाटते. सूर्यावर तर चक्क 1 अब्ज हैड्रोजन बॉम्ब एकाचवेळी फुटल्याप्रमाणे प्रचंड धमाका झाला आहे.
तसे सूर्यावर क्षणोक्षणी स्फोट होतच असतात. सूर्याची संपूर्ण उष्णता आणि तेज हे हैड्रोजन बॉम्बसारख्या स्फोटांनीच निर्माण झालेले आहे. दर सेकंदाला 60 लाख टन हैड्रोजनचे ज्वलन सूर्यावर होत असते. तथापि, हा स्फोट गेल्या कित्येक वर्षातील सूर्यावरचा सर्वात मोठा स्फोट मानण्यात येत आहे. त्याला एक्स श्रेणी देण्यात आली आहे. सूर्य प्रखर तेजस्वी असला तरी त्यावर काही काळे डागसुद्धा आहेत. यापैकी एका मोठय़ा काळय़ा डागावर कमी दाबाच्या निर्मितीमुळे हा स्फोट झाल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. या स्फोटानंतर सूर्यापासून अतिप्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग झालेला आहे. सूर्यमालेत त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. तथापि, पृथ्वीचे भाग्य बलवत्तर असल्याने ती या किरणोत्सर्गाच्या कचाटय़ात सापडली नाही. अन्यथा पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची अपरिमित हानी झाली असती, असे संशोधकांचे अनुमान आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याने येत्या काही महिन्यात ती या स्फोट झालेल्या काळय़ा डागाच्या रेषेत येणार आहे. तथापि, तोपर्यंत या स्फोटाची शक्ती नियंत्रित झालेली असेल. या स्फोटामुळे सूर्यमालेत उत्सर्जित झालेले किरण सौम्य झाले असतील. त्यामुळे पृथ्वीला फारसा धोका संभवत नाही. युरोपातील अवकाश प्राधिकरण सोलर अँड हेलिकोस्पेरिक ऑब्झर्व्हेटरीने या स्फोटाची नोंद घेतली असून सविस्तर माहितीही पुरविली आहे. अशा स्फोटांना शास्त्राrय भाषेत कोरोनल मास इजेक्शन किंवा सौर वादळ असे म्हणतात. सूर्याच्या आग्नेय भागात हा स्फोट घडून आला. सूर्यावर पाच प्रकारचे स्फोट घडतात. त्यांना ए, बी, सी, एम, आणि एक्स अशा श्रेणी देण्यात आलेल्या आहेत. यापैकी प्रत्येक श्रेणी अनुक्रमे पहिल्या श्रेणीच्या दसपट शक्तीशाली असते. नुकताच झालेला हा स्फोट एक्स श्रेणीतील अर्थात सर्वात तीव्र असल्याचे सांगण्यात आलेले आहे. अद्यापही पृथ्वीचा या स्फोटापासूनचा धोका पूर्णपणे टळल्याचे मानण्यात आलेले नसले तरी बऱयाच प्रमाणात धोका टळला आहे.









