टुगेदर फॉर मोपा संघटनेचा इशारा
प्रतिनिधी /पेडणे
सरकार जोपर्यंत पेडणेतील टॅक्सी व्यावसायिकांना मोपा विमानतळावर खास येलो ब्लॅक टॅक्सी काऊंटर उभारुन न्याय देत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरुच राहणार असा इशारा टुगेदर फॉर मोपा संघटनेने पत्रकार परिषदेत दिला. आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
पेडणे येथे टुगेदर फॉर मोपा संघटनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला बस मालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर, ऍड. जितेंद्र गावकर, भास्कर नारुलकर, टॅक्सी असोसिएशनचे सुवेक गवस, प्रितेश शेटकर, रामचंद्र गावडे, मेहुल हळर्णकर, रुपेश कांबळे, रामा वरक उपस्थित होते.
टुगेदर फॉर मोपा संघटनेच्या बॅनरखाली 2 जानेवारी रोजी धरणे आंदोलन झाले. मात्र या आंदोलनाच्या ठिकाणी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आले आणि त्यांनी आपण मुख्यमंत्र्याकडे शिष्टमंडळ नेऊन पेडणेकरांसाठी टॅक्सी काऊंटर मिळवून देतो असे सांगून आंदोलनातील काही नेत्यांना घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गेले. मात्र त्या ठिकाणी टॅक्सी बांधवांच्या बाजूने जो निर्णय व्हायला पाहिजे तो झाला नाही. तिथे सरकार आणि टॅक्सी व्यावसायिक याच्यात समेट न झाल्याने टॅक्सी ऍप आणि गोवा माईल्स याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदारासोबत गेलेल्या शिष्टमंडळाकडे चर्चा केली. मात्र हे टॅक्सी व्यावसायिकांना मान्य झाले नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार आहे. दि. 5 जानेवारी आम्ही मोपा येथे जाणाऱया रस्त्याच्याकडेला साखळी धरणे आंदोलन करणार आहोत. याबाबत सरकार अधिसूचना काढत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहिल, असे सुदिप ताम्हणकर म्हणाले.
मोपावर सरकारने येलो ब्लॅक टॅक्सींसाठी काऊंटर द्यावा जेणेकरून पेडण्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती टॅक्सी काऊंटरसाठी मान्यता दिली व किती टॅक्सासाठी काऊंटर लागणार याबाबत विचारणा केली. मात्र आम्हांला त्यांना नेमका आकडा सांगता आला नाही. याठिकाणी धंदा करण्यास अनेकजण इच्छुक असल्याने सरकार याबाबत चाल ढकल करत आहे. सरकारने ठोस भूमिका घेऊन टॅक्सी काऊंंटरची अधिसूचना जारी करण्याची मागणी ऍड. जितेंद्र गावकर यांनी केली.
मोपावर येलो ब्ल़ॅक टॅक्सी काऊंटरसाठी सरकार चाल ढकल का करत आहे. पेडणेकराच्या बाबतीतच असे का होते हे कळत नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत गांभिर्यांने यात लक्ष घालून पेडणेकरांना न्याय द्यावा, अशी मागणी भास्कर नारुलकर यांनी केली.









