वृत्तसंस्था/ शारजाह
आंतरराष्ट्रीय लीग टी-20 (आयएल टी-20) मधील शारजाह वॉरियर्सने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू मार्कस स्टोइनिसला करारबद्ध केले आहे. 33 वर्षीय स्टोइनिस या लीगशी करारबद्ध झालेला पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.
टी-20 ही फ्री लान्स इंडस्ट्री बनली असून स्टोइनिस हा पहिला असा खेळाडू आहे, जो एकाचवेळी बिग बॅश व आयएल टी-20 अशा दोन लीगमध्ये खेळणार आहे. या चालीमुळे आता यापुढे असे अनेक खेळाडू दोन लीगमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. स्टोइनिसच्या सहभागामुळे सहा संघांच्या या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय लुक येणार आहे. या लीगमध्ये संयुक्त अरब अमिरातचे 24 क्रिकेटपटूही सहभागी होत असून 13 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. स्टोइनिस सध्या बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्ससाठी खेळत असून शारजाह वॉरियर्समध्ये त्याच्यासह इंग्लंडचे मोईन अली, ख्रिस वोक्स, अफगाणचा मोहम्मद नबी, नामिबियाचा जेजे स्मिट सामील झाले आहेत.









