वृत्तसंस्था/ पुणे
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथनने पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मिग्वेल अँजेल रेयेस व्हॅरेलासमवेत खेळताना त्याने रोहन बोपण्णा व बोटिक व्हा डी झांडस्कल्प यांच्यावर 7-6 (7-5), 6-7 (4-7), 11-9 अशी संघर्षपूर्ण मात केली.
बालेवाडी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत रामकुमार व मिग्वेल या इंडो-मेक्सिकन जोडीने बलाढय़ प्रतिस्पर्धी जोडीविरुद्ध शानदार प्रदर्शन केले. बोपण्णाने तर ही स्पर्धा दोनदा जिंकली आहे. यातील दोन्ही टायब्रेकरपर्यंत लांबले. निर्णायक टायब्रेकरमध्ये मात्र इंडो-मेक्सिकन जोडीने बाजी मारली. त्यांची पुढील लढत तीन ग्रँडस्लॅम जिंकणाऱया राजीव राम व जो सॅलिसबरी या अव्वल जोडीशी होणार आहे. राजीव-सॅलिसबरी यांनी सेबॅस्टियन बाएझ व लुईस डेव्हिड मार्टिनेझ यांना 6-3, 7-6 (7-1) असे हरविले.









