युआयडीएआय’ने दिली मोठी सुविधा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी आतापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः काही नवीन शहरात जाणाऱया लोकांकडे पत्त्याचा पुरावाही नसायचा. पण आता पत्त्याच्या पुराव्याशिवायही आधारमध्ये नमूद असलेला पत्ता बदलण्याची सुविधा ‘युआयडीएआय’ने आधार कार्डधारकांना उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना काही निवडक अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
कोणताही आधार कार्डधारक व्यक्ती नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याकडे जुना पत्ता असलेले आधारकार्ड असते. अशा स्थितीत स्थानिक पालकाच्या मदतीने ऑनलाईन अर्ज भरून आधारमध्ये पत्ता बदलता येऊ शकतो. तसेच स्थानिक पालकांव्यतिरिक्त कुटुंब प्रमुखाची मदत घेऊनदेखील हे काम पूर्ण केले जाऊ शकते. पत्ता बदलण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबप्रमुखाला पत्ता बदलासंबंधी हमी द्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध असून कार्डवर नवीन पत्ता छापल्यानंतर काही दिवसांतच कार्ड घरपोच मिळू शकते. आधार केंदांवर यासंबंधीची सविस्तर माहिती प्राप्त होऊ शकते.
सर्वसाधारण प्रक्रिया
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ‘युआयडीएआय’च्या वेबसाईटचा आधार घ्यावा लागणार आहे. या वेबसाईटवर ऑनलाईन ऍडेस अपडेटिंग सेक्शनमध्ये गेल्यानंतर ‘एचओएफ’ म्हणजेच कुटुंब प्रमुखाचा पर्याय निवडावा लागेल. तेथे आधार क्रमांक नमूद केल्यानंतर ऑनलाईन सत्यापनासाठी असलेली लिंक ओपन करून माहिती भरावी लागेल. त्यानंतर नवीन पत्ता मंजूर होताच आधारमध्ये बदल होणार आहे. या निर्णयामुळे लोकांना पत्ता बदलण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही आणि त्यांचे आधारकार्ड सहज अपडेट होईल, असा सरकारचा विश्वास आहे.









