मार्चमध्ये फ्रान्स अध्यक्षांच्या दौऱयादरम्यान होणार करार
वृत्तसंस्था / पॅरिस
फ्रान्स आणि भारताचे संबंध पुन्हा वृद्धींगत होताना दिसून येत आहेत. यापूर्वी भारतीय वायुदलाने स्वतःच्या नव्या स्क्वॉड्रनसाठी राफेल लढाऊ विमानाची निवड केली होती. आता नौदलाने देखील राफेलला पसंती दर्शविल्याचे समजेत. मार्च महिन्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारताच्या दौऱयावर येणार आहेत, त्यांच्या या दौऱयादरम्यान दोन्ही देशांदरम्यान ‘राफेल’ खरेदीसाठी नवा करार होण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाने अमेरिकन लढाऊ विमान एफ/ए-18 सुपर हॉर्नेटऐवजी राफेलची निवड केली आहे. हा नवा करार भारत आणि फ्रान्सच्या संबंधांमधील मैलाचा नवा दगड मानला जात आहे. नौदल 26 राफेल एम लढाऊ विमानांसाठी अब्जावधी डॉलर्सचा करार फ्रान्ससोबत करणार आहे.
भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विक्रांतसाठी राफेलला मंजुरी मिळू शकते असा विश्वास दसॉल्ट एव्हिएशन कंपनीला आहे. राफेल एम लढाऊ विमानाचा वापर सध्या ग्रीस, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिरातचे सैन्य करत आहे. नौदलाने मागील वर्षी अमेरिकन लढाऊ विमान एफ/ए-18 सुपर हॉर्नेट आणि राफेल एम या लढाऊ विमानांचे परीक्षण केले होते. या परीक्षणाचा एक विस्तृत अहवाल डिसेंबर महिन्यात संरक्षण मंत्रालयाला सोपविण्यात आला होता.
राफेलची निवड का?
राफेल संरक्षण दलाच्या गरजा अधिक चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकतो असे नौदलाचे मत आहे. नौदल स्वतःच्या ताफ्यात जुन्या ठरलेल्या रशियन बनावटीच्या 43 मिग-29के आणि मिग-29केयुबी विमानांना हटवू पाहत आहे. प्रेंच नौदलाकडे सद्यकाळात 240 राफेल एम लढाऊ विमाने आहेत. या लढाऊ विमानांची निर्मिती दसॉल्ट कंपनीने 1986 पासून सुरू केली होती. राफेल एम हे लढाऊ विमान सीएटीओबीएआर सिस्टीमने युक्त विमानवाहू युद्धनौकेसाठी योग्य आहे. नौदलाच्या तान्यात नवी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत तसेच जुनी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य सामील आहे. विक्रमादित्य ही सोव्हियत संघाची कीव क्लासची विमानवाहू युद्धनौका असून त्याचे आधुनिकीकरण भारतात करण्यात आले आहे.
राफेल ठरले सरस
सीएटीओबीएआर सिस्टीमने युक्त विमानवाहू युद्धनौकेवर लढाऊ विमान अरेस्टेड लँडिंग करू शकतात. परंतु एसटीओबीएआरने युक्त विमानवाहू युद्धनौकेवर अरेस्टिंग गीयर्स असतात, परंतु कॅटापुल्टस नसल्याने लढाऊ विमानांना मर्यादित जागेत टेकऑफ करण्यास अडचणींना सामोरे जावे लागते. स्की जम्पच्या मदतीने दोन्ही विमानवाहू युद्धनौकांवर लढाऊ विमाने टेकऑफ करू शकतात. राफेल एम लढाऊ विमान याचमुळे सरस ठरले आहे.
अत्यंत शक्तिशाली रडार
राफेल एम लढाऊ विमानाने काही दिवसांपूर्वीच अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका जॉर्ज एचडब्ल्यू बुशवर अनेक प्रकारच्या मॅनुवर्स यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. सुपर हॉर्नेट आणि राफेल एम दोन्ही लढाऊ विमाने ऍक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड ऐरे (एईएसए) रडारने युक्त आहेत. राफेल एम विमानात आरबीई2-एए रडार आहे. हा रडार आकाश, समुद्र आणि जमिनीवरील लक्ष्याला स्कॅन आणि ट्रक करू शकतो. राफेल एम विमान स्वतःच्या व्हिज्युअल रेंजमुळे सुपर हॉर्नेटपेक्षा सरस ठरत आहे.









