भोपाळ / वृत्तसंस्था
सामुहिक बलात्काराच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या एका आरोपीने मध्यप्रदेश सरकार विरोधात 10 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागण्यासाठी दावा केला आहे. त्याला सामुहिक बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. कारागृहातील वातावरण आणि आपल्यावरील खोटा आरोप यामुळे मोठा मनस्ताप आपल्याला सहन करावा लागला. आपली अपरिमित हानी झाली. शिवाय आपण आता लैंगिक सुखापासून पारखे झालो आहोत, कारण आपली ते सुख घेण्याची क्षमता कारागृहात विनाकारण डांबल्याने नष्ट झाली आहे. असे अनेक आरोप त्याने आपल्या दाव्यात केले आहेत.
कांतू ऊर्फ कांतिलाल भिल असे या व्यक्तीचे नाव आहे. स्वतःच्या हानीसोबत आपली पत्नी, मुले आणि वयोवृद्ध आई यांनाही आपल्यावरील बलात्काराच्या खोटय़ा आरोपामुळे अतिशय मनस्ताप भोगावा लागला. या त्रासाचे शब्दांमध्ये वर्णनही करता येणार नाही. कारागृहात अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपल्याला ठेवण्यात आले होते. आपल्याला धड कपडेही देण्यात येत नव्हते. त्यामुळे थंडी आणि उष्म्याचा त्रास मोठय़ा प्रमाणात सहन करावा लागला. यामुळे आपली मोठीच मानसिक आणि शारीरिक हानी झाली आहे. या सर्व त्रासाची भरपाई म्हणून आल्याला 10 हजार कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी. आपल्याला समाधान मिळण्याचा हाच मार्ग आहे, असे त्याने म्हटले आहे.
त्वचारोग आणि निद्रानाश
कारागृहातील वातावरणामुळे आपल्याला त्वचारोग जडला आहे. तसेच निद्रानाशाचे दुखणे झाल्याने सुखाच्या झोपेलाही आपण मुकलो आहोत. पोलिसांनी आपल्याविरोधात धादांत खोटा आणि पोकळ पुरावा तयार करण्याचा प्रयत्न केला. खोटय़ा पुराव्यावर आपल्याला न्यायालयात खेचण्यात आले. आपल्यावर मानहानीकारक आरोप ठेवण्यात आले. अनेक वर्षे कारागृहात डांबण्यात आल्याने आपल्या धंद्याची मोठी हानी झाली. आपल्यावरील अत्याचारांमुळे आपले कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशाही अनेक तक्रारी त्याने मांडल्या आहेत.









