आता एफएमसीजी क्षेत्रात उतरत व्यवसाय विस्तार करणार ः सोस्यो हाजुरी ब्रेव्हरेजमध्ये घेतली हिस्सेदारी
नवी दिल्ली
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स आता एफएमसीजी क्षेत्रात आपले पाय घट्टपणे रोवण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. कॅम्पा कोलानंतर आता रिलायन्स समूह आणखी एका सॉफ्टड्रिंक कंपनीत हिस्सा खरेदी करत आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड सोस्यो हाजुरी ब्रेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील जवळपास 50 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी करणार आहे.
सदरच्या अधिग्रहणामुळे आरसीपीएलला पेयाच्या क्षेत्रात व्यवसाय विस्तार करता येणार आहे. आरसीपीएल लोटस चॉकलेटमधील समभागदेखील विकत घेत आहे.
100 वर्ष जुनी कंपनी सोस्यो हाजुरी
सोस्यो हाजुरी ही 100 वर्षे जुनी पेय उत्पादन निर्मिती कंपनी आहे. कंपनीचे विद्यमान प्रवर्तक, हाजुरी परिवार, एसएचबीपीएलमधील उर्वरित हिस्सा धारण करतील. निवेदनात म्हटले आहे की, या संयुक्त उपक्रमामुळे रिलायन्स शीतपेय क्षेत्रातील आपला वाटा अधिक वाढवू शकणार आहे.
सोस्योची स्थापना
सोस्यो हजुरीची स्थापना 1923 मध्ये अब्बास अब्दुलरहीम हजुरी यांनी केली होती. सोस्यो ब्रँड अंतर्गत शीतपेय व्यवसाय ते चालवतात. ही कार्बोनेटेड शीतपेये आणि ज्यूसच्या व्यवसायात देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. या प्रदीर्घ अनुभवाचा रिलायन्सला फायदा होईल.
विकासाच्या नव्या संधी मिळतील
या गुंतवणुकीवर रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी म्हणाल्या, ‘हा संयुक्त उपक्रम देशातील प्रस्थापित ब्रँड आणि स्थानिक व्यवसायांना वाढीसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे. आम्ही या व्यवसायात अधिक गतीने प्रगती साधू.









