मुंबई : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे म्हणणाऱ्या अजित पवार यांचे सामनाने समर्थन केले. मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्या सामनाला हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली.
पालघरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत, असे अजित पवार म्हणाले तर औरंगजेब क्रूर नव्हता असे राष्ट्रवादी काँग्रसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. अशा नेत्यांची बाजू सामनाने घेतली. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामना वृत्तपत्र सुरू केले त्यावेळी त्याचे नाव भगव्या अक्षरात लिहिले आणि त्याचे अंतरग आणि बाह्यरंग भगवे होते. पण आता उद्धव ठाकरे संपादक झाल्यावर सामनाचे अंतरंग आणि बाह्यरंग हिरवे झाले आहे. मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्या सामनाला बाळासाहेबांचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेणाऱ्यांना महाराष्ट्र दारात उभे करणार नाही.
अधिक वाचा : बाळासाहेबांची शिवसेना – पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युतीची घोषणा
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शरद पवार यांनी वेगळय़ा रितीने मांडला. आता अजित पवार हे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर असल्याचे मान्य करत नाहीत. मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले पण त्यांनी धर्म सोडला नाही. तरीही त्यांना धर्मवीर म्हणू नका, असे म्हणता. तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.








