तरुण भारततर्फे आयोजित स्पर्धांचे बक्षिस वितरण
प्रतिनिधी /पणजी
नाताळानिमित्त दै. तरुण भारतने राबविलेला अभिनव असा हा उपक्रम दोन समाजांमधील दुवा बनण्यासारखा आहे, असे प्रशंसोद्गार माजी मंत्री तथा आमदार मायकल लोबो यांनी काढले.
नाताळ सणानिमित्त दै. तरुण भारततर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिस वितरण केल्यानंतर ते बोलत होते. दै. तरुण भारतच्या आठही आवृत्यांमधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून गोवा आवृत्तीतर्फेही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
तरुण भारत हे दैनिक केवळ हिंदू लोकच वाचतात हा समज चुकीचा आहे. अन्य धर्मातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकही तेवढय़ाच संख्येने हे वर्तमानपत्र वाचतात. आधुनिक गोवा ज्याला आपण म्हणतो तेथील तरुणाई सुद्धा डिजिटल किंवा अन्य माध्यमातून हे वर्तमानपत्र वाचतात, हे आपण स्वानुभवाने सांगू शकतो, असे लोबो पुढे म्हणाले.
तरुण भारतने आता नाताळानिमित्त क्रीप आणि गिफ्ट हॅम्पर यासारख्या स्पर्धांचे आयोजन केले हा खरोखरीच स्तुत्य उपक्रम आहे. आमच्या मतदारसंघात पर्रा भागातही याच धर्तीवर दिवाळी तसेच नातालाच्या दिवसात आकाशकंदिल आणि नक्षत्र तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यात 60 टक्के सहभाग हिंदू लोकांचा असतो, असे लोबो यांनी सांगितले. अशा स्पर्धा आणि कार्यक्रमांमुळे सर्व समाजातील, जाती-धर्मातील लोकांना लोकांना एकत्र आणण्याचे कार्य घडत आहे. त्यामुळे विजेत्यांसोबतच आयोजकही अभिनंदनास पात्र आहेत, असे लोबो म्हणाले.
प्रारंभी त्यांच्याहस्ते अश्मी भगत आणि विदेश्री भगत यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. आवृत्तीप्रमुख सागर जावडेकर यांनी शाल-श्रीफळ देऊन लोबो यांचा सन्मान केला. या छोटेखानी समारंभास तरुण भारतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.









