प्रतिनिधी /फोंडा
श्रीमद् भागवत भक्तमंडळ आणि वेलिंग ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 19 जाने. दरम्यान, ‘108 भागवत सप्ताह ज्ञानयज्ञ’ वेलिंग म्हार्दोळ येथील श्री वेताळेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेत सप्ताहाचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. गोव्यात अशा प्रकारचा हा पहिलाच भागवत सप्ताह असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आयोजन समितीचे पदाधिकारी हेमंत कथने, भालचंद्र जोशी, श्रीनाथ रिंगे व वेताळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष दामोदर प्रभूगावकर हे उपस्थित होते. नागपूर येथील मोहनबुवा कुबेर हे भागवत कथा निरुपण करणार आहेत तर गोवा व देशाच्या इतर भागातील 108 जाणकार संहिता वाचन करतील. बुधवार 11 रोजी सकाळी यजमानासह प्रायश्चित व पुण्याहवाचन होईल. सायं. 5.30 वा. ग्रंथदिंडी व शंकराचार्य करवीर पिठाचे जगद्गुरु विद्या नरसिंह भारती यांचे सप्ताहस्थळी आगमन होईल. याशिवाय रोज सकाळी 9 ते दुपारी 1 वा. यावेळेत नामजप होईल. सप्ताह काळात 1 कोटी नामजप करण्याचा संकल्प आहे. याशिवाय रोज दुपारी आरत्या व महाप्रसाद होणार आहे.
गुरुवार 12 रोजी सायं. 4 वा. करवीर पीठाधीश विद्या नरसिंह भारती शंकराचार्य स्वामीजींची पाद्य पूजा व आशीर्वचन होईल. गुरुवार 12 ते बुधवार 18 जाने. पर्यंत रोज सकाळी 7 ते दुपारी 2 वा. यावेळेत संहिता वाचन होईल. सायं. 5 ते 8 वा. यावेळेत भागवत कथा निरुपण होईल. योगीराज श्री दत्तमहाराज कवीश्वर यांचे पट्टशिष्य ह. भ. प. मोहनबुवा कुबेर (नागपूर) हे मुख्य कथा निरुपण करणार आहेत. याशिवाय प. पू. नाना महाराज तराणेकर शिष्य वर्गातर्फे भक्तीसंगीत, भावगीत व भजनाचा कार्यक्रम होईल. बुधवार 19 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून श्री वेताळेश्वरास लघुरुद्र, हवन व महाप्रसादाने ज्ञानयज्ञाची सांगता होईल. भाविकांनी कथा निरुपणाचा लाभ घ्यावा, असे यावेळी कळविण्यात आले आहे.









