श्री क्षेत्र तुळजापुरात सर्वत्र वाद्यांच्या गजरात भक्तीमय वातावरण; धार्मिक रुढी परंपरेने जलयात्रा
प्रतिनिधी/ तुळजापूर
साडेतीन शक्तीपीठातील एक पूर्ण पीठ असणाऱया आई तुळजाभवानी मातेच्या धाकटय़ा दसऱयात म्हणजे शाकंभरी नवरात्र महोत्सवातील मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे जल यात्रा. ‘आई राजा उदो उदो’च्या घोषणा देत मोठय़ा उत्साहात आणि भक्ती भावाने मंगळवारी तुळजाभवानी मातेची जलयात्रा झाली.
शाकंभरी नवरात्रातील पाचव्या माळेनिमित्त विविध धार्मिक विधी सोबतच पारंपरिक रूढी परंपरेने जलयात्रा काढली जाते. पापनाश तीर्थ येथील विधीवत पूजा करून जलाचे पूजन शाकंभरी नवरात्र महोत्सवातील यजमानांच्या हस्ते करण्यात आले. शाकंभरी मातेची शाक प्रतिमा (भाजीपाला) व जल यात्रेचा कलश आकर्षक आणि सुंदर सजवलेल्या रथामध्ये बसवून गाजत वाजत ही जलयात्रा मिरवणूक भवानी रोड मार्गे मंदिरात जाते. यावेळी पंचक्रोशीतील सुहासिनी कुमारिका पवित्र पापनाश तीर्थाचे जल कलशात घेऊन ते डोक्मयावर घेऊन या मिरवणुकीत सहभागी होतात.
यावेळी आराधी वाघ्या मुरळी, गोंधळी, पताका दिंडय़ा, वारूळवाले, धनगरी ढोल, बँड, बँजो पथक, तुतारी, अद्यावत वाद्यांसह पारंपारिक वाद्य, संबळ, नगारा यांच्या वाद्यांमध्ये ही मिरवणूक मंदिराकडे निघते. यावषी उत्सवातील शोभेयात्रेमध्ये हत्ती घोडे हे जल यात्रेचे विशेष आकर्षण होते. प्रति वर्षाप्रमाणे तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाच्या वतीने सुहासिनी कुमारिका व आराधी महिलांना 5 हजार कलशाचे वाटप केले जाते. संस्थांच्या वतीने आलेल्या सर्व सुवासिनी आणि कुमारिका यांची खणा-नारळाने ओटी भरली जाते. जलयात्रेमध्ये सहभाग घेणारे भाविक-भक्तांसाठी प्रक्षाळ मंडळाच्या वतीने भवानी रोड व त्यालगत असणाऱया भाजी मंडई येथे अन्नदान महाप्रसाद भोजनाची व्यवस्था केली होती. या महाप्रसादाचा जवळपास 20 हजार भाविकांनी लाभ घेतला. जलयात्रेमध्ये भाविक भक्तांसोबत पुजारी सर्व महंत मंदिर कर्मचारी अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.