संसदेत गरोदर महिलेच्या पोटावर मारली लाथ
वृत्तसंस्था/ दकार
पश्चिम आफ्रिकेतील देश सेनेगलमधील संसदेत जोरदार हिंसा झाली होती. या हिंसेदरम्यान खासदारांनी एका गरोदर महिला खासदाराच्या पोटावर लाथ मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संबंधित महिला खासदार बेशुद्ध झाली होती, आरोपी खासदाराला या प्रकरणी 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
सेनेगलचे खासदार ममादौ नियांग आणि मसाटा सांब यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. या दोन्ही खासदारांनी एमी नदिये यांच्या पोटावर लाथ मारली होती. एमी यांनी एका विरोधी पक्षाच्या नेत्यावर टिप्पणी केली होती. याचमुळे नाराज दोन्ही खासदारांनी हे क्रूरकृत्य केले आहे. दोन्ही खासदारांना नदिये यांना 8,100 डॉलर्सची भरपाई द्यावी लागणार आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर खासदारांच्या कृत्याची निंदा केली जात आहे.
व्हिडिओत सांब हे नदिये यांना थप्पड लगावताना आणि याच्या प्रत्युत्तरादाखल नदिये एक खुर्ची उचलून फेकताना दिसून येतात. यानंतर नदिये यांच्या पोटावर दोन खासदार लाथ मारत असल्याचे यात दिसून येते. या घटनेमुळे त्यांचा गर्भपात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जुलै महिन्यात सरकारने बहुमत गमावल्यापासून सेनेगलच्या संसदेत तणावाचे वातावरण आहे.









