सम्मेद शिखरला पर्यटनस्थळ घोषित करण्यास विरोध ः जैन मुनींनी उपोषणानंतर त्यागले प्राण
वृत्तसंस्था/ जयपूर
झारखंडमध्ये जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास विरोध दर्शविणारे जैन मुनी सुज्ञेयसागर महाराज यांनी मंगळवारी प्राण त्यागले आहेत. सुज्ञेयसागर महाराज हे झारखंड सरकारच्या निर्णयाच्या विरोधात मागील 10 दिवसांपासून सांगानेर येथे आमरण उपोषण करत होते. ते 72 वर्षांचे होते.
झारखंड सरकारने गिरिडीह जिल्हय़ातील पारसनाथ पर्वताला पर्यटनस्थळ घोषित केले आहे. याच्या विरोधात देशभरातील जैन समुदाय निदर्शने करत आहे. पारसनाथ पर्वत जगभरातील जैन धर्म अनुनायींमध्ये सर्वोच्च तीर्थ सम्मेद शिखर म्हणून प्रसिद्ध आहे.
मुनीश्रींनी सम्मेद शिखर वाचविण्यासाठी बलिदान केल्याचे उद्गार अखिल भारतीय जैन बँकर्स फोरमचे अध्यक्ष भागचंद्र जैन यांनी काढले आहेत. झारखंडमधील जैन तीर्थ सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ घोषित करण्याच्या निर्णयाला विरोध वाढतच चालला आहे. यापूर्वी रविवारी अनेक शहरांमध्ये जैन समुदायांच्या लोकांनी निदर्शने केली. तसेच निदर्शकांच्या एका शिष्टमंडळाने यासंबंधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन दिले आहे.
सम्मेद शिखरला पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाला विरोध आहे. हा निर्णय जैन समुदायाच्या भावना दुखाविणारा आहे. या निर्णयामुळे तीर्थक्षेत्राचे नुकसान होईल असे निदर्शकांचे म्हणणे आहे. झारखंड सरकारने अद्याप सम्मेद शिखरला पर्यटनस्थळाच्या यादीतून वगळलेले नाही. परंतु देशभरातील निदर्शनांनंतर याला धार्मिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्याचा आदर करा
यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने देखील जैन समुदायाच्या मागणीचे समर्थन केले. सम्मेद शिखर एक तीर्थक्षेत्र असून त्याला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाऊ नये. भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अशाप्रकारे कुठल्याही तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळात रुपांतरित केले जाऊ नये असे विधान विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी केले आहे.
असा सुरू झाला वाद?
सम्मेद शिखरच्या परिसरात मांस-मद्याच्या खरेदीविक्रीवर बंदी आहे, तसेच त्याचे सेवन करण्यासही मनाई आहे. काही दिवसांपूर्वी या तीर्थक्षेत्रात एक युवक मद्यपान करत असल्याचे दर्शविणार व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर वाद उभा ठाकला आहे. पर्यटनस्थळ घेषित झाल्यापासून जैन धर्माचे पालन न करणाऱया लोकांची गर्दी येथे वाढली आहे. तसेच मांसाहार अन् मद्यपान करणारे लोक या तीर्थक्षेत्री येऊ लागल्याचा आरोप होत आहे.