टॅक्सी व्यावसायिकांची मागणी ; नागझर येथे धरणे आंदोलन
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना मोपा विमानतळावर स्वतंत्र टॅक्सी काऊंटर द्यावा आणि तोही मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर करून लेखी स्वरूपात असावा, तरच आम्ही मागे हटणार. अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा पेडणे तालुक्मयातील टॅक्सी व्यावसायिकांनी सोमवार दि.2 रोजी नागझर येथे धरणे आंदोलनात दिला .
टुगेदर फॉर मोपा या धरणे आंदोलनाला गोव्यातील विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शवला होता. त्यात बस मालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर, ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशनचे उदय महाले, पत्रकार किशोर नाईक गावकर, ऍड. जितेंद्र गावकर, पेडणे नागरिक समितीचे अध्यक्ष भरत बागकर, मगोचे राजन कोरगावकर, समाज कार्यकर्ते विष्णूदास कोरगावकर, आरजीचे मनोज परब, आरटीआय कार्यकर्ते पोळजी, पेडणे तालुका बहुजन समाज अध्यक्ष उमेश तळवणेकर, नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, पंच उदय मांदेकर, मोपा सरपंच सुबोध महाले, चांदेल सरपंच तुळशीदास गावस, धारगळ सरपंच अनिकेत साळगावकर, वारखंड सरपंच गौरी जोसलकर, कोरगाव सरपंच समिल भाटलेकर, खाजने अमेरे पोरस्कडे सरपंच निशा हळदणकर, तोरसे सरपंच प्रार्थना मोटे, वजरी सरपंच नवनाथ नाईक, हळर्ण सरपंच दिव्या नाईक, इब्रामपूर सरपंच अशोक धावस्कर, उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई,नगरसेवक सिद्धेश पेडणेकर , नगरसेवक विष्णू साळगावकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, नगरसेवक मनोज हरमलकर, नगरसेविका राखी कशालकर, संजय कोले, प्रभाकर नारुलकर, यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
आपण पेडणेकरां सोबत ः प्रवीण आर्लेकर
टॅक्सी व्यावसायिकांचे प्रश्न सुटले नाही, तर आपणही त्यांच्यासोबत रस्त्यावर यायला तयार आहे. स्थानिकांनी टॅक्सी काऊंटर देण्यासाठी केलेल्या आंदोलनात आपण पेडणेकरांसोबत राहणार असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शिष्टमंडळ सोबत चर्चा करून योग्य तो लेखी निर्णय देतील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायला शिष्टमंडळ घेऊन जाऊया आणि नंतरच काय तो निर्णय घेऊया असे आमदार आर्लेकर यांनी सांगितले.
त्यानंतर टुगेदर फॉरचे नेते ऍड. जितेंद्र गावकर , पत्रकार किशोर नाईक गावकर, भास्कर नारुलकर, उदय महाले, सुरेल गवस, प्रतिश शेटकर, प्रसाद भाईडकर यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. परंतु जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत जागेवरून हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
काऊंटर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ः ताम्हणकर
पेडणेवासियांच्या हितासाठी आपण या आंदोलनात सहभागी झालो आहे. पेडणेकरांना टॅक्सी काऊंटर कायद्याने मिळायला हवा, आपल्या बसगाडय़ा मोपा विमानतळावर लागाव्यात यासाठी आपण आलो नाही. पेडणेकरांच्या हितासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांना न्याय मिळावा हक्काचा येलो ब्लॅक टॅक्सी व्यावसायिकांना काऊंटर मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच चालू ठेवणार असे बस मालक संघटनेचे सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले
पेडणेवासियांच्या हितासाठी एकत्र याः मनोज परब
केवळ टॅक्सी व्यावसायिकांचा हा प्रश्न नसून पूर्ण पेडणेवासियांच्या हिताचा प्रश्न आहे. जंगले गेली. जमिनी गेल्या, पाणी गेले, आणि आता राहिलेला एकमेव टॅक्सी व्यवसायही पेडणेकर यांच्या हातातून हिसकावून घेऊन तो बिगर गोमंतकीयांच्या हातात देण्यासाठी सरकार कार्यरत आहे. केवळ टॅक्सी व्यवसाय संबंधित नव्हे तर सर्व तऱहेचे व्यवसाय, नोकऱयांसाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या पिढीत शेतकऱयांनी संघटित होऊन या आंदोलनात सहभागी होऊन आपापले प्रश्न सरकारकडून सोडून घ्यावेत, असे आरजीचे मनोज परब यांनी सांगितले.
आम्हाला न्याय कधी मिळणार ?
आमच्या जमिनी गेल्या, घर संसारावर नांगर फिरवले, आमचे प्रश्न कुणीच घेत नाही? केवळ मोपा विमानतळ झाला म्हणून टॅक्सी व्यवसाय मिळावा यासाठी यांची धडपड आहे. स्थानिकांना स्वतंत्र काऊंटर मिळावा यासाठी धावपळ आहे आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न एका पिढीत शेतकऱयाने उपस्थित केला.
टॅक्सी ऍप आणून सरकार आता पेडणेतील टॅक्सी व्यवसायिकांच्या तोंडाचा घास काढू पहात आहे. मात्र आता लढण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही सरकारकडे केवळ पेडणेतील टॅक्सी व्यवसायीकांसाठी खास काउंढटर मागतो ती मागणी सरकारने मान्य करावी, अशी मागणी भरत बागकर यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी, उदय मांदेकर, तुळशीदास फडते, सुनिल नाईक आदेंची या आंदोलनाला पाठिंबा देणारी भाषणे झाली.









