ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग यंदा मंदीच्या सावटाखाली असेल. इतकंच नाही तर ज्या देशांमध्ये मंदी नाही, तिथल्या लोकांनाही मंदी असल्यासारखं वाटेल, असा सूचक इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा (Kristalina Georgieva) यांनी दिला आहे.
जॉर्जिव्हा म्हणाल्या, अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीनमधील मंदीमुळे 2023 हे वर्ष 2022 पेक्षा अधिक कठीण असेल. चीनमधील झिरो-कोविड पॉलिसीमुळे 2022 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेची गती कमी झाली आहे. 40 वर्षांत पहिल्यांदाच चीनची वाढ जागतिक अर्थव्यवस्थेच्या सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्ध, अधिक व्याज दर आणि चीनमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर पुन्हा दबाव वाढला आहे.
अधिक वाचा : अजित पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग प्रभावित झाले असून, महागाई रोखण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. दरम्यान, चीनने आपले शून्य कोविड धोरणाला ब्रेक लावला आणि अर्थव्यवस्था पुन्हा खुली करण्यास सुरुवात केली, मात्र देशात अद्यापही करोना आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग यंदा मंदीच्या सावटाखाली असेल.









