स्थानिक पुढारी पसारच : पोलिसांकडून कसून शोध जारी
खेड / प्रतिनिधी
लोटे औद्योगिक वसाहतीतील इंडी डय़ूट मेटॉलो केमिकलसह मिशाल झिंक इंडस्ट्रीज कंपनीतील 3 कोटी रूपयांच्या मशिनरी व इतर लोखंडी साहित्य चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील स्थानिक पुढारी पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
मुन्ना सिंग, संतोष महाडिक अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. 30 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2019 दरम्यान घडलेल्या साहित्य चोरीप्रकरणी लोटे येथील ए. बी. माऊरी कंपनीचे वैभव विलास आंब्रे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या दोन कंपन्यांच्या इमारतीची तोडफोड करून मोठे लोखंडी चॅनेल, लोखंडी ट्रक, रिऍक्टर, बॉयलर, लोखंडी चिमण्या, कंपनीच्या मशिनरी, लोखंडी शेड, लोखंडी भट्टी, लोखंडी ब्लोअर लाईन्स व इतर कंपनीचे जुने साहित्य असा 3 कोटी रूपयांचा ऐवज ट्रकमधून लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
याशिवाय वैभव आंब्रे यांनी येथील पोलीस स्थानकात पुरवणी तक्रार दाखल करून दोन कंपन्यांमधून 30 कोटी रूपयांचे भंगार साहित्य चोरीला गेले, असे मूल्यांकन करण्याची मागणीदेखील केली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामाही केला. या साहित्य चोरीप्रकरणात स्थानिक पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार 8 जणांसह स्थानिक पुढाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. या पुढाऱ्यांची नावे गुलदस्त्यातच आहेत.
या भंगार साहित्य चोरी प्रकरणातील दोघांच्या अटकेनंतर स्थानिक पुढारी फरार झाले आहेत. या फरारी पुढाऱ्यांच्या मागावर येथील पोलीस आहेत. या चोरी प्रकरणाशी असलेल्या राजकीय कनेक्शनमुळे पोलिसांनाही अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र तरीदेखील फरारी स्थानिक पुढाऱ्यांचा पोलिसांकडून कसून शोध जारी आहे. या स्थानिक पुढाऱ्यांच्या अटकेनंतरच या चोरी प्रकरणाचा खरा उलगडा होणार आहे.