पर्यटकांची फसवणूक सुरूच, आता गाईड लोकांचा नवा फंडा
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात नाताळनंतर आता नवीन वर्षाची जय्यत तयारी सुरू असल्याने पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. राज्यातील इतर तालुक्याबरोबरच पणजी शहरातही मोठय़ा प्रमाणात हॉटेल, निवासस्थाने हाऊसफुल्ल झाली आहेत. याचाच फायदा घेऊन काही गाईड लोक वाहने पार्किंगच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटकांची लुबाडणूक खपवून घेणार नसल्याचा इशारा देऊनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून आता गाईड लोकही पर्यटकांकडून पैसे उकळतात, असा प्रकार सुरू आहे. असा प्रकार रात्रीस खेळ चाले या न्यायाने सुरू आहे.

संध्याकाळी सातनंतर पणजीतील सर्व रिकाम्या जागा वाहनांच्या पार्किंगने व्यापून जात आहेत. यामागचे नेमके कारण म्हणजे गाईड लोक पर्यटकांना पार्किंगची जागा दाखवून त्यांच्याकडून किमान 200 ते 300 रुपये आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी नो-पार्किंग असे क्षेत्र आहे, अशा ठिकाणीही वाहने लावली जात असल्याने रस्ते दुतर्फा वाहनांनी व्यापून गेले आहेत. स्थानिकांच्या बंगले व घरासमोरील रिकाम्या जागेतही वाहने लावली जात असल्याने स्थानिक व पर्यटक यांच्यात काहीवेळा वादावादी होत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग होत आहे. शहरातील गल्ली-बोळातील रस्त्यातही हाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे लक्षात येते. खासकरून पणजी चर्च परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर पर्यटकांची वाहने लावलेली दृष्टीस पडतात. काही गाईड लोक पर्यटकांना मिळेल त्या मोकळ्या जागेत गाडी लावायला सांगतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. त्यामुळे हा अजब प्रकार आता पुढे आला आहे. महापालिकेतर्फे पार्किंग व्यवस्थेसाठी व्यक्ती नेमलेल्या आहेत. परंतु संध्याकाळच्या वेळेलाही या लोकांची सेवा सुरू असतानाही गाईड लोक परस्परच आपणच पार्किंग व्यवस्थेची सेवा देत असल्याचे पर्यटकांना भासवून त्यांच्याकडून रक्कम उकळत आहेत.
सद्यःस्थितीत पणजी चर्च परिसरातील अंतर्गत रस्ते, सचिवालयाच्या मागील बाजूच्या रस्त्यावर दुतर्फा वाहने दृष्टीस पडतात. पाटो ब्रीज, रुआ दी ऑरेम, कॉर्तिन परिसर, टपाल खाते परिसर व अंतर्गत रस्ते, जुन्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुलाखालील पेट्रोल पंपाजवळील परिसर, 31 जानेवारी रस्ता, पीपल्स हायस्कूल, मेरी इमॅक्युलेट ते पबपर्यंत तसेच रेसिडेन्शियल भागात परराज्यातील वाहने लावली जात आहेत.
मुख्यमंत्र्यांचा इशारा तरीही…
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पर्यटक हा राज्याचा आधार असल्याचे सांगून त्यांची फसवणूक करणाऱयांची गय करणार नसल्याचा इशारा दिला होता. पण, हा इशारा केवळ इशारा बनून राहिला आहे. कारण पर्यटकांना मदत करणारे गाईड लोकच पर्यटकांना वाहने पार्किंगच्या नावाखाली फसवत आहेत. ज्या ठिकाणी गाडी लावण्यास जागा शिल्लक आहे, त्याची चाचपणी हे गाईड लोक करतात आणि पर्यटकांना त्या ठिकाणी वाहने पार्क करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हा नवीन फंडा आता पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
स्थानिकांना बसतोय फटका
राजधानी पणजीत सर्वत्रच वाहने दृष्टीस पडत आहेत. गल्ली-बोळातही आता पार्किंग सुरू झाल्याने याचा फटका स्थानिकांना बसत आहे. स्थानिकांच्या जागेतही आता वाहने पार्क केली जात असल्याने आम्ही नेमकी वाहने लावायची कुठे? असा प्रश्न पडला असून, रात्रीच्या वेळेला वाहतूक पोलिसांची नजर चुकवून गाईड लोक पर्यटकांना नो एन्ट्रीतही वाहने लावण्यास भाग पाडत आहेत. याचा त्रास दुकानदार व इतर व्यावसायिकांनाही होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.









