देवीचा घेतला आशीर्वाद, मंदिर समितीकडून सत्कार
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी रात्री सपत्नीक भेट देऊन देवीचा आशीर्वाद घेतला. देवीचा वार्षिक जत्रोत्सव सध्या उत्साहात चालू असून मुख्यमंत्री सावंत यांनी जत्रोत्सवात सहभागी होऊन सभोवताली फेरफटका मारून पाहणी केली. सुलक्षणा सावंत यांनी देखील देवीची ओटी भरून नवस फेडला.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित असलेल्यांमध्ये कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफासियो डायस, गुडी-पारोडा उपसरपंच दीपक खरंगटे, कुंकळ्ळीचे नगरसेवक विदेश देसाई, राहुल देसाई व संस्थानचे माजी अध्यक्ष नितीन नाईक देसाई, विनोद देसाई व इतर मान्यवर मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. गुरुवारचा दिवस हा गावकरांचा होता. त्यामुळे मुख्य वांगडी याप्रसंगी तीर्थप्रसाद देण्याचे काम करत होते.
नंतर मुख्यमंत्री सावंत व सुलक्षणा सावंत यांनी देवालय कार्यालयाला भेट देऊन मंदिर कार्यकारिणीशी संवाद साधला. नवीन समितीचे अध्यक्ष कवेंद्र श्रीकांत नाईक देसाई, सचिव विराज यशवंत देसाई, खजिनदार दर्शन रामा देसाई व मुखत्यार सुभाष पळपुटो देसाई यांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच देवीची प्रतिमा त्यांना भेट देण्यात आली. सुलक्षणा सावंत यांना देवीच्या मूर्तीवर वापरलेले खण व कापड देऊन सन्मानित करण्यात आले.









