बेळगाव-पणजी जादा बससेवा सुरू करण्याची गरज : खराब रस्त्याची सबब पुढे करून बस रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-कुसमळी-बेळगाव अशी स्थानिक बससेवा सुरू करावी तसेच बेळगाव-चोर्ला-पणजी जादा जलद बससेवा सुरू करावी अशी मागणी जांबोटी, कुसमळी उचवडे परिसरातील नागरिक व विद्यार्थी वर्गातून होत आहे.
जांबोटी, कुसमळी, उचवडे, सोनारवाडी, किणये आदी गावातून शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी व नागरिक व्यवसाय, नोकरी, बाजारहाट तसेच इतर कामासाठी पिरनवाडी, उद्यमबाग, बेळगाव या ठिकाणी नियमित ये-जा करतात. मात्र, या मार्गावर अपुरी बससेवा असल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशी वर्गांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वर्षभरापूर्वी बेळगाव-जांबोटी व्हाया चोर्ला, पणजी अशा बऱ्याच जलद तसेच लांब पल्ल्याच्या बसेस या मार्गाने नियमित जात होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरील कर्नाटक तसेच कदंब परिवहन महामंडळाच्या अनेक जलद व लांब पल्ल्याच्या बसगाड्या खराब रस्त्याची सबब पुढे करून रद्द केल्या आहेत. शिवाय गाड्यांचे वेळापत्रक देखील कोलमडले असल्याने प्रवाशी व विद्यार्थी वर्गांचे हाल होत आहेत.
दुपारी बस नसल्याने गैरसोय
दुपारी 12-30 ते 4 वाजेपर्यंत जांबोटीहून बेळगावकडे जाणारी एकही जलद अथवा स्थानिक बस नसल्याने प्रवाशी वर्गांला जांबोटी बस स्थानकावर तासन्तास बसच्या प्रतीक्षेत ताटकळत रहावे लागते. तसेच या मार्गावरील जलद बसेसना कुसमळी, उचवडे, किणये आदी गावामध्ये बस थांबा उपलब्ध नसल्यामुळे या गाड्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कुचकामी ठरल्या आहेत. गोव्याला जाणाऱ्या सर्व जलद बस केवळ बेळगाव, पिरनवाडी, जांबोटी याच ठिकाणी थांबून प्रवाशी घेत असल्यामुळे कुसमळी, उचवडे, किणये येथून बेळगाव अथवा पिरनवाडी या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सध्या बेळगाव-जांबोटी या मार्गावर सकाळी व संध्याकाळी या वेळेस केवळ चिगुळे आणि चिखले या दोन स्थानिक बस गाड्या धावतात. कुसमळी, उचवडे, सोनारवाडी आदी गावातून माध्यमिक शिक्षणासाठी किणये तसेच पिरनवाडी येथे अनेक विद्यार्थी जातात. मात्र जलद गाड्यांना कुसमळी आणि उचवडे थांबा नसल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांच्या वेळेत स्थानिक बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी वर्गाला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
प्रत्येक कॉलेजच्या वेळापत्रकाप्रमाणे पोहचणे कठीण
बेळगाव येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयाचे वेळापत्रक वेगवेगळे असल्यामुळे त्यांना वेळेत बसद्वारे महाविद्यालयाला पोहचणे अवघड होत असल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच काही जलद बसचे वाहक व चालक पासधारक विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश देत नसल्यामुळे स्थानिक बसेसची वाट पाहात विद्यार्थ्यांना बेळगाव रेल्वेस्टेशनवर तासन्तास ताटकळत थांबावे लागते. परिणामी सकाळी महाविद्यालयासाठी गेलेले विद्यार्थी रात्री उशिरा घराकडे परतत असल्यामुळे विशेषता विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे
जलद बसेसचा परवाना विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा
यासाठी बेळगाव व्हाया किणये, कुसमळी जांबोटी अशी दिवसातून किमान चारवेळा स्थानिक बस सुरू करावी तसेच बेळगावहून चोर्लामार्गे गोव्याला जाणाऱ्या सर्व जलद बसेसना विद्यार्थ्यांना बस परवाना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जांबोटी, कुसमळी, किणये परिसरातील पालक वर्गातून होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज
परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गावर जलद बसेसची संख्या वाढवावी. तसेच जांबोटी-कुसमळी-बेळगाव अशी स्थानिक बससेवा सुरू करावी. तसेच सर्व जलद बस गाड्यांना कुसमळी व किणये येथे बसथांबा उपलब्ध करून देऊन बसअभावी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी जांबोटी भागातील प्रवासी विद्यार्थी वर्गातून होत आहे.









