येळ्ळूर ग्राम पंचायतीने कॅन्सरग्रस्त महिलेच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत
प्रतिनिधी /येळ्ळूर
काही जणांच्या नशिबी देव दु:खच देतो, असे वारंवार म्हटले जाते. संकटावर संकटे कुटुंबांवर कोसळतात. अशाच प्रकारे येळ्ळूर येथील शीला कोकणे या महिलेवर संकट कोसळले आहे. मानसिक संतुलन ढासळल्यामुळे गेली अनेक वर्षे ती गावामध्ये फिरत होती. मात्र गेल्या वर्षभरापासून ती कॅन्सरच्या आजाराने त्रस्त झाली आहे. घरची परिस्थिती हलाखीची यातच हा आजार झाला. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
ऊन, पाऊस, थंडी याची जाणीव कधीच त्या महिलेला झाली नाही. रात्रीच्यावेळी देखील ती गावात फिरत होती. तिच्यावर घरच्यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे मानसिक संतुलन स्थिर झाले नाही. त्यामुळे घरच्या लोकांनीही उपचार करणे थांबविले. अचानकपणे जोरदार पळणे, ओरडणे असे प्रकार ती करत होती. बऱ्याचवेळा लहान मुले चेष्टा देखील करत होती. पाऊस, उन्हामध्ये ती फिरत होती. मात्र तिने कधीच कुणाला त्रास दिला नाही. केवळ मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बडबडण्याव्यतिरिक्त तिने काहीच केले नाही.
सध्या तिचे वय 60 च्या दरम्यान आहे. यातच तिला कॅन्सर झाला आहे. महात्मा फुले गल्ली येथे राहणाऱ्या या महिलेच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची माहिती ग्राम पंचायतीला मिळाली.
ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, सदस्या रुपा पुण्याण्णावर आणि सामाजिक कार्यकर्ते भीमराव पुण्यण्णावर यांनी त्या महिलेच्या कुटुंबाला मदत केली आहे.









