खानापूर तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन सादर : समस्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे बोम्माईंकडून आश्वासन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बेळगाव सुवर्णसौधमध्ये विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी बसवराज बोम्माई यांनी समस्यांबाबत तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
खानापूर तालुका भाजप नेत्यांनी विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री बोम्माई यांची भेट घेऊन तालुक्यातील समस्यांबाबत निवेदन देऊन चर्चा केली. तालुक्याचा समावेश मलनाड भागात करावा, यासाठी सध्या असलेल्या 6 जिल्हा पंचायत मतदारसंघांऐवजी 8 जिल्हा पंचायत मतदारसंघ करावेत, तसेच 21 वरून 27 तालुका पंचायत मतदारसंघ तयार करावेत. यामुळे तालुक्याचा विकासाचा समतोल साधता येईल. तसेच तालुक्यात 51 ग्राम पंचायती आहेत. त्यांची संख्या वाढवून 65 इतकी करावी. तालुक्यतील दुर्गम भागाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा तसेच तालुक्यात विविध विकासकामे राबविण्यास मंजुरी देण्यात यावी, नगरपंचायतीचा दर्जा वाढवून नगरपालिका म्हणून घोषणा करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यासाठी रस्त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी-नाले आहेत. त्यांच्या पात्राशेजारी तसेच पात्रात वाळू उपसा करण्यास रितसर परवानगी द्यावी, यामुळे तालुक्यातील जनतेला रोजगार उपलब्ध होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
लघुसिंचन योजना मंजूर करा
तालुक्यातील ग्रामीण भागात पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून लघुसिंचन योजना मंजूर कराव्यात. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच दुर्गम भागातील वनभागात विकासकामे राबविण्यात वनखात्याचे आडमुठे धोरण अडथळा ठरत आहे. त्यासाठी वनविभागाने रस्ते, वीज आदी सुविधा पुरविण्याच्या कामांमधील अडसर दूर करावा, यासह अन्य विकासकामांबाबत निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, धनश्री देसाई, गजानन पाटील व भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.









