अदानी विल्मरच्या समभागांना लागले अप्पर सर्किट
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बीएसई सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांच्यात काहीशी घसरण राहिली होती. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 17 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक बंद झाला आहे. यावेळी जागतिक संकेतासोबत अन्य देशातील घडामोडींचा परिणाम हा भारतीय शेअरबाजारावर झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स 17.15 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 60,910.28 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 9.80 अंकांनी घसरुन निर्देशांक 18,122.50 वर बंद झाला आहे. यामध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 17 समभाग तेजीत तर 13 समभाग नुकसानीत राहिल्याची नोंद केली आहे.
अदानी विल्मरच्या समभागामध्ये बुधवारच्या सत्रात अप्पर सर्किट लागले आहे. यामध्ये 5 टक्क्यांच्या तेजीसोबत समभाग 578 रुपयावर बंद झाला आहे. पेटीएमच्या समभागात तेजीचा कल राहिला असून यात समभाग 22.15 रुपयांनी अर्थात 4.32 टक्क्यांनी वधारुन 535 रुपयावर बंद झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील क्षेत्रांमध्ये औषध क्षेत्रात सर्वाधिक घसरण राहिली आहे. यामध्ये 0.56 टक्क्यांची घसरण राहिली. यासह धातू, बँक, आयटी या क्षेत्रात काही प्रमाणात घसरणीची नोंद झाली आहे. याच्या विरुद्ध बाजूला रियल्टी आणि वाहन क्षेत्रातील निर्देशांकांत तेजी राहिली असून यामध्ये 0.49 टक्के आणि 0.66 टक्क्यांची तेजी नेंदवत बंद झाला आहे. तर एफएमसीजी व मीडिया हे वधारत बंद झाले आहेत.
शेअरबाजारामध्ये मागील दोन सत्रात राहिलेली सलगची तेजी आता थांबली आहे. यामुळे आता चालू वर्ष संपण्यास काही मोजकेच दिवस शिल्लक राहिले असल्याने भारतीय शेअरबाजार चालू आठवडय़ातील दिवसांमध्ये कोणती कामगिरी करणार हे पहावे लागणार आहे.









