विविध संघटनांच्यावतीने अॅड. राम आपटे यांना आदरांजली
प्रतिनिधी /बेळगाव
अॅड. राम आपटे यांचा सीमासत्याग्रहामध्ये सुरुवातीपासून सहभाग होता. माजी आमदार बा. र. सुंठणकर, बाबुराव ठाकुर यांच्यासमवेत त्यांनी काम केले. त्यानंतरच्या साराबंदीच्या चळवळीत त्यांचा मोठा वाटा होता. कन्नडसक्ती जशी वाढत गेली तसे त्यांनी भाषिक अल्पसंख्याक विषयावर पुस्तक लिहून सीमावासियांच्या व्यथा मांडल्या. म. ए. समितीचे चिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तज्ञ समितीचे सदस्यपद त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळले. त्यामुळे अॅड. राम आपटे यांच्या जाण्याने म. ए. समितीचे व सीमालढ्याचे अतोनात नुकसान झाल्याचे माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी सांगितले.
विविध संघटनांच्यावतीने मंगळवारी आयोजित आदरांजली सभेमध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर द. म. शि. मंडळाचे सुभाष ओऊळकर, माजी प्राचार्य आनंद मेणसे, अॅड. राजाभाऊ पाटील, अशोक देशपांडे उपस्थित होते. विविध संघटना व संस्थांच्यावतीने अॅड. राम आपटे यांना आदरांजली वाहण्यात आली.
अशोक देशपांडे म्हणाले, जीवनात यश-अपयश, पराभव पचवत त्यांनी वाटचाल केली. समाजात होणारा अन्याय, अत्याचार याविरोधात त्यांनी लढा दिला. सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर राबले. दादांनी अनेकांना स्वत:च्या पायावर उभे करून बळ दिले. ‘लाच घेणार नाही व लाच देणार नाही’ या ध्येयाने त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची मदत केली. आपल्या जीवनातील काही पुंजी बाजूला करत त्यांनी जीवन विवेक प्रतिष्ठान स्थापन केले. विविध संघटनांच्या माध्यमातून लोकांचा उद्धार कसा होईल, याकडे त्यांनी लक्ष पुरविल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात राम आपटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली. विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अॅड. राम आपटे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. भ्रष्टाचार निर्मूलन परिवारातर्फे शंकर चौगुले, सांगली येथील राहुल थोरात, कामगार संघटनेचे जी. व्ही. कुलकर्णी, द. म. शि. चे प्रा. सुरेश पाटील यांनी मनोगते व्यक्त करून आदरांजली वाहिली. यावेळी विविध संघ व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.









