विरोधकांची सभापतींकडे मागणी
प्रतिनिधी /पणजी
विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक तातडीने बोलवावी, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दोन तीन आठवडय़ांनी वाढवावा, मागील फक्त 5 वर्षांचीच माहिती देणारे परिपत्रक मागे घेण्यात यावे अशा प्रकारे विविध मागण्या विरोधी पक्षीय आमदारांनी केल्या असून त्याचे निवेदन सभापती रमेश तवडकर यांना सादर केले आहे. त्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमावसह इतर विरोधी आमदारांच्या सहय़ा आहेत.
आगामी विधानसभा अधिवेशनातील रणनिती ठरवण्यासाठी पर्वरी येथील मंत्रालयातील विरोधी पक्षनेते आलेमाव यांच्या दालनात विरोधी आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीत फक्त 4 दिवसांचे अधिवेशन आणि मागील 5 वर्षाचीच माहिती देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली.
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
विरोधी आमदारांच्या खासगी कामकाजासाठी शुक्रवार हा दिवसही देण्यात आला नाही. पहिला दिवस राज्यपालांच्या अभिभाषणात जाणार असल्याने प्रत्यक्षात तीनच दिवसांचा कालावधी मिळतो. याकडे सर्वांनी लक्ष वेधून मागील पावसाळी अधिवेशन 25 दिवसांऐवजी 10 दिवसात गुंडाळण्यात आले आणि पुढील अधिवेशनात दिवस वाढवून देण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. ते पाळण्यात आले नाही आणि हिवाळी अधिवेशनही 4 दिवसात गुंडाळण्यात येणार असल्याने विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचाच हा प्रकार असल्याची टीका बैठकीतून करण्यात आली.
खासगी कामकाजाचा दिवस द्यावा
मूळ प्रश्नावर 5 ऐवजी 10 उपप्रश्न विचारण्याची अनुमती द्यावी, खासगी कामकाजाचा दिवस म्हणून शुक्रवारी अधिवेशन घेऊन त्यास मान्यता मिळावी, जर शुक्रवारी शक्य नसेल तर दुसरा एखादा दिवस खासगी ठराव, विधेयके यासाठी देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
विरोधी आमदारांना समान संधी देण्यात यावी, उत्तरे 48 तासांपूर्वी मिळाली पाहिजेत, कारण त्यावर अभ्यास करून उपप्रश्न विचारणे, ते ठरविणे शक्य होते. सभापतीनी या निवेदनाची दखल घेऊन वरील सर्व मागण्यांची पूर्तता करावी, योग्य ती कृती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर युरी आलेमाव, विजय सरदेसाई, विरेश बोरकर, कार्लुस फेरेरा, एल्टॉन डिकॉस्ता, क्रूझ सिल्वा, व्हेन्सी व्हिएगश यांच्या सहय़ा आहेत.









