आरोपी शीझान खानचा दावा, तुनिशाला फसविल्याचा आईचा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
धर्म वेगवेगळे असल्याने आपण तुनिशा शर्मा हिच्याशी संबंध तोडले, असा खळबळजनक दावा या प्रकरणातील आरोपी शीझान खान याने पोलिसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तुनिशा शर्मा हिने मुंबईतील नायगाव येथे चित्रीकरण होत असलेल्या स्टुडिओच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केली होती. तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली शीझान खान याला अटक करण्यात आली असून तो पोलीस कोठडीत आहे. धर्म भिन्न असल्याने संबंध तोडले असे तो म्हणतो. पण संबंध ठेवताना धर्म वेगळे आहेत हे माहीत नव्हते का, असा प्रश्न विचारला जात आहे. हे प्रकरण वाटते तेव्हढे सरळ नसून यात कारस्थानही असू शकते असा संशय व्यक्त होत आहे.
श्रद्धा वालकर हिची हत्या तिच्या मुस्लीम मित्राने केली होती. त्यामुळे देशात अतिशय खळबळजनक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आपणही तुनिशा शर्माशी संबंध तोडल्याचीही पुस्ती त्याने जोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमचे धर्म भिन्न असल्याने आमचे संबंध राहू शकत नव्हते. त्यातच वालकर प्रकरण घडल्याने वातावरण बिघडले होते, असे त्याने पोलीस तपासात सांगितले.
तुनिशाच्या आईचा आरोप
तुनिशा शर्मा हिच्या आईने शीझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. खान याने तुनिशाचा उपयोग करुन घेतला. तिच्याशी संबंध ठेवले आणि तिची फसवणूक केली. नंतर तिला वाऱयावर सोडून दिले. त्यामुळे ती दबावात आली. परिणामे तिने आत्महत्या केली, असे आरोप तिच्या आईने केले आहेत.
लव्ह जिहाद शक्यतेचाही तपास
तुनिशा शर्मा हिने शनिवारी आत्महत्या केली होती. रविवारी तिच्यासह काम करणाऱया शीझान खान याला अटक करण्यात आली होती. शर्मा आणि खान हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी लव्ह जिहादच्या शक्यतेचाही तपास करण्यात येणार आहे. तसेच ही आत्महत्या आहे की, हत्येचे प्रकरण आहे, याचाही तपास केला जाणार आहे. कोणतीही शक्यता नाकारली नसून सर्व दृष्टीकोनांमधून तपास करु असे पोलिसांनी स्पष्ट केले.









