अर्थमंत्री अयाज सादिक यांच्याकडून संकेत
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानमध्ये पुढील वषी ऑगस्टमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याची माहिती सोमवारी पाकिस्तानचे अर्थमंत्री अयाज सादिक यांनी दिली. सुरुवातीला एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर 15 ऑगस्टनंतर सार्वत्रिक निवडणुका होतील, असे ते म्हणाले. याचदरम्यान माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) साठी आघाडीच्यावतीने प्रचारधुरा सांभाळतील, असे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानमध्ये अलीकडेच सत्तांतर होऊन इम्रान खान यांना पदच्युत व्हावे लागले होते. त्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-एन या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्तास्थापन केली होती. इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ या पक्षाचे खासदार फुटल्याने आणि अपक्षांनी या सरकारचा पाठिंबा काढल्याने खान यांचे सरकार कोसळले होते. आपल्या हातून सत्ता गेल्यानंतर इम्रान यांनी सरकारविरोधात आंदोलन छेडत पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी तीव्र केली आहे. पंजाब आणि खैबर पख्तुनख्वामधील विधानसभा विसर्जनाबाबत पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेतल्यास निवडणुकांच्या नियोजनात बदल होण्याची शक्यता काही नेतेमंडळींनी व्यक्त केली आहे.









