नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 26 ते 30 डिसेंबरदरम्यान आंध्रप्रदेश आणि तेलंगणा दौऱयावर असून त्या विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्या तेलंगणातील सिकंदराबादला भेट देणार आहेत. सोमवारी त्यांनी आंध्रप्रदेशातील श्रीशैलम मंदिरालाही भेट दिली. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन मोहिमेअंतर्गत मंदिराच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले. 27 डिसेंबर रोजी राष्ट्रपती हैदराबादमधील केशव मेमोरियल एज्युकेशनल सोसायटीच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना संबोधित करतील. तसेच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीला भेट देत अधिकारी व प्रशिक्षणार्थींना संबोधित करणार आहेत. 28 आणि 29 रोजीही त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील. त्यानंतर 30 डिसेंबर रोजी दिल्लीला परतण्यापूर्वी राष्ट्रपती निलयम येथे मान्यवरांसोबत स्नेहभोजन करणार आहेत.









