आर्थिक वर्षात 34 टक्के विकास ः वाहन मागणीचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात सुटय़ा भागांचा (ऑटो कंपोनंटस्) व्यवसाय प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे. या उद्योगाने आर्थिक वर्ष 2022-23 मधील पहिल्या सहामाहीत 34 टक्के इतकी प्रगती साधलेली पाहायला मिळाली आहे. वाहन सुटय़ा भागांच्या उद्योगाने 2.65 लाख कोटींची उलाढाल वरील कालावधीत नोंदवली आहे. पॅसेंजरसह इतर वाहनांच्या मागणीत वाढ दिसली असल्याने सुटय़ा भागांच्या व्यवसायालाही चांगले दिवस पाहायला मिळत आहेत.
ऑटोमोटीव्ह कंपोनंटस् मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून वरील माहिती देण्यात आली आहे. सुटय़ा भागांची निर्यात वरील कालावधीत 8 टक्के वाढत 79.02 लाख कोटी रुपयांची झाली आहे. दुसरीकडे या भागांची आयात 17 टक्के वाढत 79.8 कोटी रुपयांची झाली आहे. पॅसेंजरसह व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत कमालीची प्रगती दिसली आहे. दुचाकी विक्री ही उत्सवी काळात दमदार राहिली असून आगामी काळातही ती अधिक राहिल अशी आशा आहे. पुरवठा साखळी सुधारणेसोबत सेमीकंडक्टरची उपलब्धता यामुळे सुटय़ा भागांच्या उद्योगाला गती घेता आली.
पॅसेंजरसह सुव्ह गटातील गाडय़ांना पसंती
सुटय़ा भागाच्या उद्योगाला प्रगती साधता आली त्यात पॅसेंजर वाहनांचा वाटा 38 टक्के इतका राहिला होता. सुव्ह व याशी संबंधीत वाहनांच्या मागणीत अलीकडच्या काळात झालेली वाढ सुटय़ा भागाच्या उद्योगाला गती घेण्यासाठी सहाय्यकारक ठरली आहे.









