म. ए. समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
प्रतिनिधी /कोल्हापूर
महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने दडपशाही करत परवानगी नाकारली. तसेच कोल्हापुरातून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही मेळाव्याला येण्यापासून रोखण्यात आले. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आज सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे. अडीच हजार सीमाबांधव मोटारसायकलने कोल्हापुरात दाखल होणार आहेत. तसेच कोल्हापुरातील महाविकास आघाडीसह सर्व पक्षाचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहे.
कर्नाटक सरकार गेले 68 वर्षे सीमाबांधवांवर अन्याय करत आहे. या हुकूमशाही विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. बेळगावमध्ये महामेळाव्यास परवानगी नाकारल्याने कोल्हापूरमधून कर्नाटक सरकारवर निशाणा साधण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सोमवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनासाठी बेळगाव सीमाभागामधून सुमारे अडीच हजार सीमाबांधव सहभागी होणार आहेत. तसेच कोल्हापुरातील सर्वपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आदोंलनात उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले जाणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के.पोवार, भाकपचे कॉ. दिलीप पवार, सतिशचंद्र कांबळे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, जनता दलाचे शिवाजीराव परूळेकर, शेकापचे बाबूराव कदम, कादर मलबारी, बाबा पार्टे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगळे, अॅड. एम.जी. पाटील, जयराम मिरजकर यांचा धरणे आंदोलनात सहभाग असणार आहे.
कोगनोळी टोलनाक्यावर जमा होण्याचे आवाहन
बेळगाव शिवाजी उद्यान येथील शिवमूर्तीला सकाळी 8 वा. वंदन करून मराठी भाषिक कोल्हापूरला रवाना होणार आहेत. सकाळी कोगनोळी टोलनाक्यापुढील महाराष्ट्राच्या हद्दीतील आरटीओ नाक्यावर सर्वांनी एकत्र जमायचे आहे. तेथून मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जायचे आहे. त्यानंतर दिवसभर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. गावागावात जागृती करण्यात आली असल्याने मोठ्या संख्येने मराठी भाषिक आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांपर्यंत सीमावासियांचा आवाज पोहोचविणार
बेळगाव : सीमावासासियांच्या व्यथा सोडविण्यामध्ये महाराष्ट्र सरकार व राज्यकर्ते अपयशी ठरत आहेत. याचाच फायदा घेत कर्नाटक सरकारने कन्नड सक्तीसह येथील मराठी भाषा संपविण्याचा घाट घातला आहे. लोकशाही मार्गाने सुरू असणाऱ्या या लढ्याला बाधा आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कर्नाटक विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनावेळी म. ए. समितीने महामेळावा आयोजित करून आपला निषेध व्यक्त केला. परंतु यावेळी मात्र जमावबंदीचा आदेश देत महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली. तसेच दडपशाही करत घातलेला मंडप काढण्यात आला. संतापलेल्या मराठी भाषिकांनी महाराष्ट्राकडे दाद मागण्याची सूचना समिती पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. त्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली ‘चलो कोल्हापूर’चा नारा देण्यात आला.
सोमवार दि. 26 रोजी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी धरणे आंदोलन करत सीमावासियांचा आवाज महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कोल्हापूरमधून वाढता प्रतिसाद
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कोल्हापूर येथील विविध संघ संस्था व सर्वपक्षिय नेत्यांना आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. बेळगावपासून जवळच असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना मराठी भाषिकांच्या व्यथा माहिती असल्याने आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. शिवसेनेसह मराठा मोर्चा संयोजकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.









