जयंत पाटील यांचे आश्वासन : म. ए. समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे भेट घेतली. कोल्हापूर विमानतळावर झालेल्या या भेटी दरम्यान कर्नाटक सरकारची दडपशाही व मांडण्यात आलेल्या ठरावाची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांच्यासमोर कर्नाटक सरकार मराठी भाषिकांचे कशा पद्धतीने छळ करते, हे सांगण्यात आले. आदल्या दिवशीपर्यंत महामेळावा करा, असे सांगणारे पोलीस महामेळाव्यादिवशी मात्र जमावबंदीचा आदेश बजावून कारवाई करू लागले. त्यामुळे आतातरी महाराष्ट्र सरकारने सीमावासियांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
आमदार पाटील यांनी कर्नाटक सरकारने सीमाप्रश्नाविरुद्ध मांडलेल्या ठरावाची माहिती घेतली. तसेच महाराष्ट्रातील विधिमंडळात सीमावासियांचा आवाज पोहोचवू, असे आश्वासन दिले. यावेळी मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समितीचे सचिव एम. जी. पाटील यांसह इतर उपस्थित होते.









