बिशप डेरेक फर्नांडिस यांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
नाताळ हा केवळ ख्रिस्ती बांधवांचा नाही तर इतर सर्व समाजांना घेऊन हा सण साजरा होतो. केवळ आनंद, उत्साह एवढाच या सणाचा उद्देश नसून गरजवंतांना मदतीचा हात देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हादेखील आहे. त्यामुळे यावर्षीचा नाताळ हा गरजूंना मदत करून साजरा करा, असे आवाहन बेळगाव डायोसिसचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी केले.
शनिवारी बिशप हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या वर्षीच्या नाताळाविषयी माहिती दिली. प्रभू येशू यांनी अनेक संकटे झेलून समाजाचा उद्धार व्हावा, यासाठी आपले जीवन खर्ची घातले. प्रभू येशूच्या जन्मोत्सवामुळे समाजात नवा उत्साह संचारतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात बेळगाव डायोसिसमध्ये नाताळ साजरा होणार आहे. यासाठी प्रत्येक चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
एकूणच समाजाचा विचार करता आज अनेकांना मदतीची गरज आहे. अन्न-पाण्याविना अनेकांचे जगणे असह्या झाले असल्याने त्यांना प्राधान्याने मदत करून नाताळ साजरा होणार आहे. ख्रिश्चन धर्मियांसह इतर सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा बिशप डेरेक फर्नांडिस यांनी दिल्या. यावेळी लुईस रॉड्रिग्ज व इतर फादर उपस्थित होते.









