वृत्तसंस्था/ कराची
पाक क्रिकेट मंडळातर्फे पुरुषांच्या निवड समिती हंगामी प्रमुखपदी माजी अष्टपैलू शाहीद आफ्रिदीची नियुक्ती केली आहे. यापूर्वी मोहम्मद वासीम हे पाक निवड समितीचे प्रमुखपद भूषवित होते. दरम्यान, अलीकडेच त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
पीसीबीची 14 सदस्यांची समिती नव्याने स्थापण्यात आली आहे. या नव्या समितीने मोहम्मद वासीम यांना प्रमुख पदावरून हटविले. शनिवारी माजी अष्टपैलू शाहीद आफ्रिदीची हंगामी निवड समिती प्रमुख म्हणून घोषणा केली. पीसीबीच्या या नव्या निवड समितीमध्ये माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक, राव इफ्तिकार अहमद, हरुण रशीद यांचा समावेश आहे. पाकची नवी निवड समिती आता मायदेशात होणाऱया न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड करेल. न्यूझीलंडचा संघ पाकविरुद्ध 2 कसोटी तसेच 3 वनडे सामने खेळणार आहे. मोहम्मद वासीमकडे 2020 च्या डिसेंबरपासून निवड समिती प्रमुखपद होते. तसेच पीसीबीच्या अध्यक्षपदी नजीम सेठी यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे.









