जेथे गेलो तेथे प्रेम मिळाल्याचे प्रतिपादन, सोनिया गांधी, प्रियांका वढ्राही सामिल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राहुल गांधींच्या पदयात्रेने शनिवारी देशाची राजधानी दिल्लीत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या माता सोनिया गांधी आणि भगिनी प्रियांका वढ्रा होत्या. तसेच असंख्य काँगेस कार्यकर्त्यांचाही समावेश यात्रेत होता. जेथे आम्ही गेले तेथे लोकांचे प्रेम मिळाले, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पदयात्रा दिल्लीत पोहचली. सीमेवर बदरपूर येथे काँगेसच्या दिल्ली शाखेचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी यात्रेचे स्वागत केले. यावेळी ध्वजहस्तांतरणाचा कार्यक्रमही झाला. यात्रा नंतर लाल किल्यापर्यंत पोहचली. तेथून राहुल गांधी यांनी भाषण केले. काही लोक द्वेष पसरवीत आहेत. लोकांचे लक्ष्य महत्वाच्या मुद्दय़ावरुन हटविण्यासाठी हिंदू-मुस्लीम वादाला खतपाणी घातले जात आहे. मिडीयावरुनही अशाच प्रकारचा प्रचार होत आहे. तथापि, या देशातील लोकांना एकमेकांबद्दल प्रेम आहे. त्यांना शांतता हवी आहे. प्रत्येक राज्यात लाखो लोक यात्रेत सहभागी झाले, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले.
संघ आणि भाजपवर टीका
भाषणात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका केली. संघ देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ही यात्रा द्वेष, भीती, बेरोजगारी आणि महागाई विरोधात आहे. संघ प्रथम द्वेष पसरवतो आणि नंतर त्याचे रुपांतर द्वेषभावनेत करतो. आम्ही तसे करत नाही. कन्याकुमारी ते दिल्ली असा 108 दिवसांचा या यात्रेचा प्रवास लोकांच्या सहकार्यामुळे पार पडला आहे. आम्ही निश्चितपणे काश्मीरला जाऊ आणि तेथे तिरंगा फडकवू. कोणताही अडथळा पार करुन आम्ही तेथे जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या यात्रेत कोणीही सहभागी होऊ शकतो. ते नितीन गडकरी असोत, राजनाथसिंग असोत किंवा माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू असोत, ते सहभागी होऊ शकतात. ज्यांना द्वेषाला विरोध करायचा आहे आणि ज्यांना देश एकसंध करायचा आहे, ते सर्व या यात्रेत सहभागी होऊ शकतात, असे आवाहनही गांधी यांनी केले.
कोरोना नियमांचे पालन नाही
यात्रेत सहभागी होणाऱयांनी कोरोना नियमांचे पालन करावे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी चार दिवसांपूर्वी केली होती. तथापि, यात्रा दिल्लीत पोहचली तेव्हा कोणीही या नियमांचे पालन करताना दिसला नाही. यात्रेत सहभागी नेते आणि कार्यकर्ते यांनी मास्कचा उपयोग केला नव्हता, तसेच सामाजिक अंतरही पाळले जात नव्हते. यावर सोशल मिडियातून बऱयाच विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या असेही दिसून आले होते.
नेत्यांचा समावेश
दिल्लीत यात्रा पोहचल्यानंतर दिल्लीतील स्थानिक नेते, विभागांमधील कार्यकर्ते, तसेच काँगेसचे खासदार आणि पदाधिकारी यात्रेत समाविष्ट झाले. सकाळी साडेदहा वाजता यात्रा जयदेव आश्रम येथे आली. त्यानंतर काहीकाळ विश्ंाखांती घेऊन ती संध्याकाळी साडेचारच्या सुमारास लाल किल्ला परिसरात आली.
यात्रेला ख्रिसमसची सुटी
आज रविवारपासून पदयात्रा 9 दिवसांसाठी खंडित केली जाणार आहे. रविवारी ख्रिसमस आहे. तेव्हापासून 3 फेब्रुवारी पर्यंत यात्रेला विश्रांती दिली जाणार आहे. राहुल गांधी या सुटीच्या काळात इटलीला आपल्या मामाकडे जाणार आहेत, असे वृत्त आहे. मात्र, याला काँगेसकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही
देश एकसंध करण्यासाठी यात्रा
राहुल गांधींचे काँगेस कार्यकर्त्यांना देश एकत्र करण्याचे आवाहन ड देशातील जनता गुण्यागोविंदाने नांदणारी आहे ः गांधींचे प्रतिपादन









