समुद्रसपाटीपासून 4,600 मीटरच्या उंचीवर, हिमालयाच्या पर्वतशिखरांमध्ये असलेल्या तपोवनात सध्या तीन साधक तपस्या करीत आहेत. येथे तापमान शून्य अंशाखाली आहे. संपूर्ण हिंवाळाभर ते त्याखालीच राहणार आहे. तरीही या तपस्वींना त्याची तमा बाळगलेली नाही. हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीतही त्यांची साधना होत आहे. ही कथा पुराणांमधील नाही, तर वर्तमानातील आहे.

हे तपस्वी आपल्या तपसाधनेत इतके लीन झालेले असतात की त्यांना येथील थंडीचे काहीच वाटत नाही. हे तपोवन उत्तराखंडातील उत्तर काशी येथे आहे. प्रत्येक वर्षी येथे देशाच्या अनेक भागांमधून तपस्वी काही काळासाठी तपसाधना करण्यासाठी येतात. पण हे तीन साधू काही वर्षांपासून येथे दिसत आहेत. कमीत कमी अन्नावर आपला तपस्याकाल ते व्यतीत करतात. ज्या थंडीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्य माणूस आपल्या घरातून बाहेर पडायलाही धजावत नाही, अशा वातावरणात ते दिवसरात्र साधनेत मग्न असतात. सांप्रतच्या काळात त्यांची संख्या वाढताना दिसत आहे. हिंवाळय़ाच्या दिवसांमध्ये हिमालयात अक्षरशः रक्त गोठविणारी थंडी असते. तशाही स्थितीत ते तपश्चर्या पूर्ण करतात.
काही वर्षांपूर्वी येथे एकच संन्यासी अशी तपश्चर्या करताना दिसला होता. पण आता ही संख्या वाढून 3 झाली आहे. हे कोण आहेत, त्यांची नावे काय आहेत, आणि ते देहाला इतके कष्ट देऊन अशी तपश्चर्या का करीत आहेत, हे कोडे उलगडलेले नाही. तथापी, हे सत्य आहे हे त्यांना पाहिलेले असंख्य लोक म्हणतात. एका गुहेत ते वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे उष्णता देणारी वस्त्रेही दिसत नाहीत. अशा स्थितीत ते कसे राहू शकतात याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.









