प्रमुख पाच कारणांचा प्रभाव ः निफ्टीही घसरणीसह बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
ख्रिसमसच्या अगोदरच शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण नागरिकांना ख्रिसमसवर सांतारॅलीची अपेक्षा होती. भारतीय भांडवली बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. तसे पाहिल्यास ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठय़ा प्रमाणात तेजीचे वातावरण राहते. मागील दोन दशकांमध्ये 80 टक्क्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये बाजारात तेजी असायची परंतु यावेळी ही तेजी नव्हती.
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी भारतीय भांडवली बाजारात शुक्रवार हा काळा दिवस ठरला आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये सेन्सेक्स तब्बल 1000 अंकांनी कोसळला आहे. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1.61 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 980.93 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 59,845.29 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 320.55 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,806.80 अंकांनी प्रभावीत झाला आहे.
सेन्सेक्सची शुक्रवारी 60,205.56 अंकांवर सुरुवात झाली होती. ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 60,546.88 अंकापर्यंत वर चढला होता तर 59,765.56 अंकांची नीचांकी पातळीही सेन्सेक्सने गाठली होती. 30 मधील 29 समभाग नुकसानीसोबत बंद झाले आहेत.
मागील चार दिवसांपासून नुकसानीत
मागील चार दिवसांमध्ये सेन्सेक्स तब्बल 1600 अंकांनी नुकसानीत राहिला अ ाहे. तसेच चालू महिन्यात शेअरबाजार आतापर्यंत 4.6 टक्क्यांनी म्हणजेच 2900 अंकांनी घसरणीत राहिला आहे.
मोठय़ा घसरणीची कारणे ः अमेरिकेतील आकडे
कंझ्युमर कॉन्फिडेंस, बेरोजगारी व तिमाहीमधील जीडीपीच्या सकारात्मक आकडेवारीने सकारात्मकता निर्माण केली होती. तसेच अमेरिकेन केंद्रीय बँकेने व्याजदरात आणखीन वृद्धी केल्याने त्याचा परिणामही बाजारावर झाला आहे.
कोरोनाची पुन्हा धास्ती
कोरोनाची नवी लाट जगभरात पुन्हा पसरत असल्याने काळजीचे ढग निर्माण होत आहेत. कारण चीनमध्ये दिवसागणिक कोरोनाचे आकडे वाढत आहेत. तर 5000 इतके मृत्यू होत असल्याची माहिती आहे. एका अभ्यासानुसार चीनमध्ये आणखी मृत्यू वाढण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने जगभरात पुन्हा धास्ती निर्माण झाली.
जपानमध्ये महागाई
आशियातील बाजारात दबाव असल्याचे कारण म्हणजे जपानमधील महागाईचा दर होय. यामुळे याचा परिणाम भारतीय बाजारावर झाल्याचे सांगितले जाते.









