अमेरिकेतून झेलेंस्की यांची मोठी घोषणा : पहिल्या विदेश दौऱयात मागितली आणखी शस्त्रास्त्र

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
सुमारे 10 महिन्यांपूर्वी फेब्रुवारीत रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की हे स्वतःच्या पहिल्या विदेश दौऱयावर आहेत. झेलेंस्की हे बुधवारी अमेरिकेत पोहोचले. व्हाइट हाउसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडने यांची भेट घेतल्यावर झेलेंस्की यांनी काँग्रेसच्या सदस्यांना संबोधित केले आहे. तर बिडेन यांनी झेलेंस्की यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत युक्रेनला सातत्याने समर्थन करत राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिका अतिरिक्त 1.8 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजच्या हिस्स्याच्या स्वरुपात युक्रेनला पॅट्रियल क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा पुरविणार असल्याचे बिडेन यांनी सांगितले. झेलेंस्की यांनी अमेरिकेच्या समर्थनासाठी आभार मानले आणि युक्रेन या युद्धात कधीच शरणागती पत्करणार नसल्याचे विधान केले आहे.

रशियासोबतचे युद्ध कितीही लांबू दे, अमेरिका युक्रेनसोबत उभा राहणार आहे. युक्रेनला कधीच एकाकी पडू देणार नसल्याचे बिडेन यांनी झेलेंस्कींना सांगितले आहे. 10 महिन्यांपासून सुरु असलेल्या युद्धात अमेरिका युक्रेनला सर्वाधिक मदत करणारा देश ठरला आहे. रशियाची नाराजी आणि राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या धमक्यांना झुगारत अमेरिका सातत्याने युक्रेनला शस्त्रास्त्रs पुरवत आहे. सुमारे 2 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजच्या घोषणेसह बिडेन यांनी आणखी 45 अब्ज डॉलर्सच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.
युक्रेनसोबत पूर्ण जग
युपेन युद्धाचा प्रभाव पूर्ण जगावर दिसून येत आहे. युक्रेनचे काही सहकारी युद्धात पाण्यासारखा खर्च केला जाणारा पैसा, जागतिक अन्न आणि ऊर्जापुरवठय़ावर पडत असलेल्या प्रभावामुळे द्विधामनस्थितीत असल्याचीही चर्चा आहे, परंतु बिडेन यांनी अशाप्रकारच्या चिंता नाकारत युक्रेनच्या समर्थनासाठी एकजुटता पाहून अत्यंत चांगले वाटत असल्याचे उद्गार काढले आहेत. जागतिक आघाडी एकजूट ठेवण्यावरून कुठलीच चिंता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
झेलेंस्कींनी मागितले समर्थन
स्वतःच्या पहिल्या विदेश दौऱयात झेलेंस्की हे युद्धात त्यांचा ट्रेडमार्क ठरलेल्या पोशाखात दिसून आले. काँग्रेस युक्रेनसाठी 45 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजला मंजुरी देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तर युक्रेनला ‘ब्लँक चेक’ (कोरा धनादेश) देणार नसल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टीकडून देण्यात आला आहे. अमेरिकेच्या विशेष विमानाने वॉशिंग्टनमध्ये पोहोचलेले युक्रेनचे अध्यक्ष देखील पुढील महिन्यात अमेरिकेच्या संसदेत होणाऱया बदलांबद्दल जाणुन आहेत. काँग्रेसमध्ये होणाऱया बदलानंतरही युक्रेनसाठी दोन्ही पक्षांचे समर्थन प्राप्त होईल असा विश्वास असल्याचे झेलेंस्की म्हणाले.
अमेरिकेच्या संसदेला केले संबोधित
व्हाइट हाउसमधील बैठकीनंतर झेलेंस्की यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. अमेरिकेच्या खासदारांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. आमचा देश अद्याप ‘सर्व अडथळय़ांच्या विरोधात’ ठाम उभा असल्याचे म्हणत झेलेंस्की यांनी पुढील वर्षी संघर्षात एक ‘टर्निंग पॉइंट’ दिसून येणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. युक्रेन कधीच झुकणार नाही. आमच्याकडे तोफा आहेत, परंतु त्या पुरेशा नाहीत असे माझे प्रामाणिक मत आहे. रशियाच्या सैन्याला पूर्णपणे मागे ढकलण्यासाठी आम्हाला आणखी तोफा आणि गोळय़ांची गरज असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.









