प्रतिनिधी /बेळगाव
चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातही विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी काही उपाययोजना आखण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
बुधवारी सुवर्ण विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना तिसऱ्या लाटेनंतर चीन, जपानसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. खासकरून चीनमध्ये इस्पितळात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढती आहे. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत असून मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन मार्गसूची जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचा नवा व्हेरियंट येतो आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्तींची जिनोमिक टेस्ट करण्याची सूचना आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी करायची आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तिसरा डोस देण्यावरही भर देण्यात येत आहे. बेंगळूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असेही डॉ. सुधाकर यांनी सांगितले.









