आमदारकीसाठी मराठा उमेदवारालाच प्राधान्य द्या : मराठा समाजाला 2 ए आरक्षण देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकातील मराठा समाजाला 3 बी मधून 2 ए मध्ये आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी सुवर्णसुवर्णसौध समोर धरणे आंदोलन करण्यात आले. बेंगळूर येथील मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ भारती यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला होता. यामुळे मराठ्यांचे भगवे वादळ सुवर्णसौध परिसरात पहायला मिळाले. बेळगावसह अनेक मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य अधिक असल्यामुळे मराठा उमेदवारालाच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संधी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मराठा समाजाला मार्गदर्शन करताना गोसावी मठाचे मंजुनाथ स्वामीजी म्हणाले, जोवर चंद्र-सूर्य आहेत तोवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नाव सर्वत्र गाजत राहिल.
शिवरायांनी फक्त राज्यच केले नाही तर राष्ट्रभक्ती, धर्मभक्तीचे धडे दिलेत. त्यांचे चरित्र वाचले की, नैतिकता, सामाजिकता काय असते हे समजून येते. राज्यात 60 ते 70 लाख मराठा समाज असतानाही समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अधिकाधिक मराठा उमेदवारांना संधी द्यावी, समाजाला आरक्षण मिळाल्यास विकास होणार असल्याने आरक्षण मिळण्यासाठी पक्षभेद बाजूला विसरून सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठा मोर्चाचे संयोजक किरण जाधव म्हणाले, मराठा समाज आरक्षणाअभावी मागे पडला आहे. आरक्षण मिळाल्यास सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात समाजाची प्रगती होऊ शकते. आरक्षण मिळावे यासाठी केवळ बेळगावच नाही तर बिदर, भालकी, रायचूर, जमखंडी, हल्याळ, कारवार येथूनही मराठा समाज येथे उपस्थित असल्याचे सांगितले. विनय कदम म्हणाले आजवर सर्वच राजकीय पक्षांनी समाजाची अवहेलना केली आहे. केवळ मतांचे राजकारण न करता समाजाला आरक्षण द्यावे, असे त्यांनी सांगितले.
उमेदवारी अन् आरक्षणासाठी वरिष्ठांशी चर्चा
कर्नाटकात मोठ्या संख्येने मराठा समाज आहे. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी ज्या ज्या ठिकाणी मराठा समाज तुलनेने अधिक आहे तेथे मराठा उमेदवार देण्याबाबत पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करू असे आश्वासन भाजपचे वरिष्ठ नेते व ऊर्जामंत्री सुनिलकुमार यांनी दिले. आंदोलन स्थळाला मंत्री श्रीरामलू, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतिश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार काकासाहेब पाटील, चिकोडीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, आमदार अनिल बेनके, आमदार महादेवप्पा यादवाड, माजी मंत्री श्रीमंत पाटील, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, आनंद न्यामगौड, डॉ. सोनाली सरनोबत, वैभव कदम यांच्यासह इतर उपस्थित होते.
सतिश जारकीहोळी यांच्या भाषणावेळी गोंधळ
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतिश जारकीहोळी हे मराठा समाजाला संबोधण्यासाठी उभे राहताच काहीजणांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. निपाणी येथे आमदार जारकीहोळी यांनी संभाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेवटी घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी बाजूला हटविले. तरी देखील गोंधळ काही केल्या कमी झाला नाही. त्यामुळे जारकीहोळी यांनी आपले भाषण आटोपते घेतले. तसेच काही क्षणातच त्यांनी तेथून जाणे पसंत केले.









