अगसगे ग्रा. पं.वर धडक मोर्चा काढून विचारणार जाब : कोणतीही पूर्वकल्पना न देता घरासमोरील काँक्रीट जेसीबीने उखडल्याने संताप, ग्रामस्थांचे नुकसान
वार्ताहर /अगसगे
अगसगे ग्राम पंचायतीने अतिक्रमणचे कारण पुढे करून सर्वसामान्यांना नाहक त्रास सुरू केला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता घरासमोरील काँक्रीट जेसीबीने उखडून काढले आहे. यामुळे संबंधित कुटुंबीयांकडून ग्रा. पं.च्या मनमानी कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय याबाबत आता ग्रा. पं.ला जाब विचारला जाणार आहे.
कलमेश्वर गल्लीचा हा मुख्य रस्ता असून 66 फूट रुंदीचा आहे. सदर गल्ली सर्व्हे नंबरमध्ये येते. या गल्लीत मध्यभागी काँक्रिटचा रस्ता करण्यात आला आहे. यामुळे येथील नागरिकांच्या घरासमोर चिखल होऊ नये म्हणून घरापासून रस्त्यापर्यंत काँक्रिट घातले होते. ग्रा. पं. ने संबंधितांना पूर्वसूचना व नोटिसा न देता अचानक जेसीबीने उखडून काढले आहे. यामुळे संबंधितांचे आर्थिक नुकसान झाले असून घरासमोर ख•s पडले आहेत. यावेळी जाब विचारणाऱ्यांना ग्रा. पं. ने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सर्वसामान्य नागरिक घरासमोर चिखल होऊ नये म्हणून काबाडकष्ट करून पैसे जमवून काँक्रीट घालतात. यामुळे रस्ता आणि गल्लीदेखील स्वच्छ व सुंदर दिसत होते. मात्र ग्रा. पं.ला हे आवडले नसल्यामुळे जेसीबीने संपूर्ण काँक्रीट उखडून काढले आहे. याच कलमेश्वर गल्लीमध्ये काही धनाढ्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे ग्रा. पं.ने कानाडोळा केल्याचा आरोप नागरिकांनी केला. काँक्रीट उखडून काढल्यामुळे घरासमोर ख•s पडले आहेत. तसेच ग्रा. पं. ने काँक्रीट घालताना अडवले असते तर आमचे नुकसान झाले नसते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ग्रा. पं. ने अतिक्रमणाची मोहीम संपूर्ण गावामध्ये राबवली पाहिजे. मात्र कलमेश्वर गल्लीपुरतीच का, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. याबाबत ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे आता ग्रा. पं. वर धडक मोर्चा नेऊन जाब विचारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री बोम्माईकडून होणार तलावाची पाहणी
रोजगार हमी योजनेमधून गावातील तलावाचा विकास आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे. यामुळे अमृत सरोवर योजनेमध्ये अगसगे तलावाचे नाव नोंद झाले. सध्या बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या तलावाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि इतर काही मंत्री व अधिकारी गावाला भेट देणार आहेत. यामुळे गावातून तलावाकडे जाणाऱ्या कलमेश्वर गल्लीमध्ये ठेवलेल्या विटा, दगड, लाकूड व केरकचरा काढला आहे. वाहने जाताना अडथळा होऊ नये म्हणून काहींचे घरासमोरील काँक्रिट उखडून काढले आहेत. रस्ताही स्वच्छ केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आम्ही हे काम केले आहे.
– पीडीओ प्रशांत मुन्नोळी









