वृत्तसंस्था/ बार्सिलोना
स्पेनचा टॉप सिडेड टेनिसपटू राफेल नदालच्या प्रशिक्षक वर्गामध्ये आता अर्जेंटिनाचा माजी टेनिसपटू गुस्तावो मार्कासिओचा समावेश करण्यात आला आहे. 2023 च्या टेनिस हंगामामध्ये आता नदालला मार्कासिओचे मार्गदर्शन लाभेल.
तीन दिवसापूर्वी नदालचे प्रमुख प्रशिक्षक फ्रान्सिस रोईग यांनी आपले पद सोडले होते. 2021 च्या एप्रिलपासून मार्कासिओ नदाल अकादमीमध्ये कार्यरत आहे. मार्कासिओने आपल्या प्रशिक्षक पदाच्या कारकीर्दीत आघाडीचे 10 टेनिसपटू मोनॅको, कार्लोस मोया, मार्क लोपेझ यांना मार्गदर्शन केले आहे. नदालने आतापर्यंत आपल्या टेनिस कारकीर्दीत विक्रमी 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत. 2022 च्या टेनिस हंगामात नदालला दुखापतीच्या समस्येने चांगलेच दमवले होते पण आता तो येत्या जानेवारीत होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद पुन्हा स्वतःकडे राखण्यासाठी सज्ज झाला आहे.









