वृत्तसंस्था/ पॅरीस
फ्रान्स फुटबॉल संघातील हुकमी स्ट्रायकर करीम बेन्झेमाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. कतारमध्ये रविवारी झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपद मिळवले होते. गतविजेत्या फ्रान्सला यावेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेनंतर केवळ 24 तासाच्या कालावधीत बेन्झेमाने निवृत्तीचा निर्णय घेतला. करीम बेन्झेमा 2022 चा बॅलन डीओरचा मानकरी आहे. कतारच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत बेन्झेमा दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता. तरी पण गेल्या रविवारच्या अंतिम सामन्यासाठी बेन्झेमाला फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते, पण दुखापतीमुळे त्याने या अंतिम सामन्याला आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळविले.
2014 साली झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत करीम बेन्झेमाने फ्रान्सतर्फे सर्वाधिक गोल नोंदवले होते. पण त्यानंतर त्याच्यावर सेक्सस्कॅन्डलमध्ये गुंतल्याचे आरोप झाल्याने त्याला फ्रान्सच्या संघातून वगळण्यात आले होते. या कारणास्तव तो 2018 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करू शकला नाही. फ्रान्सने 2018 ची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. फ्रान्सचे प्रशिक्षक डिडियर देशाँ यांनी युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेसाठी बेन्झेमाला संघात स्थान मिळवून दिले होते. त्या स्पर्धेमध्ये तो फ्रान्सतर्फे सर्वाधिक गोल नोंदवणारा फुटबॉलपटू ठरला होता. बेन्झेमाने आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 97 आंतरराष्ट्रीय सामन्यात फ्रान्सचे प्रतिनिधीत्व करताना 37 गोल नोंदवले.









