वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा ओडिशातील भुवनेश्वर आणि राऊरकेला या दोन शहरांमध्ये 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. स्पर्धा आयोजकांनी या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली असून राऊरकेलातील अद्ययावत स्टेडियम तसेच नवे विमानतळ सज्ज करण्यात आले आहे.
ओडिशाचे प्रमुख सचिव एस. सी. मोहापात्रा यांनी राऊरकेलामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सर्वात मोठय़ा स्टेडियमला तसेच विमानतळाला भेट दिली. त्यांच्यासमवेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव व्ही. के. पंडियान उपस्थित होते. येत्या काही दिवसामध्ये विमानतळावरील सर्व सुविधा आधुनिक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या आदेशावरून या नव्या स्टेडियमला तसेच विमानतळाला सचिवांनी भेट दिली होती.
राऊरकेलातील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम हे सर्व सोयीनिशी या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिले आहे. या स्टेडियमची क्षमता 20 हजार प्रेक्षकांची असून भारतातील सर्वात अधिक क्षमतेचे स्टेडियम राहिल. या स्पर्धेत सहभागी होणाऱया संघांच्या सराव सामन्यांना 24 डिसेंबरपासून प्रारंभ होईल. भारत आणि स्पेन यांच्यातील पहिला सरावाचा सामना 24 डिसेंबरला खेळवला जाणार आहे. सदर स्पर्धा भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर आणि राऊरकेलाच्या बिरसा मुंडा स्टेडियमवर 13 ते 29 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे बांधकाम केवळ एक वर्षात पूर्ण करण्यात आले आहे.









