150 ते 500 किमीपर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनसोबत सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान भारतीय सैन्य पहिल्यांदाच टॅक्टिकल ऑपरेशन्ससाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सामील करणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याने प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्षेपणास्त्र 150 ते 500 किलोमीटरपर्यंत स्वतःच्या लक्ष्याचा भेद घेऊ शकते.
डिसेंबर 2021 मध्ये सलग दोन दिवसांमध्ये दोनवेळा या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून भारतीय सैन्य याचे अधिग्रहण आणि स्वतःच्या ताफ्यात सामील करण्याच्या दिशेने काम करत आहे. चीन सीमेवर या क्षेपणास्त्राला तैनात करण्याची प्रक्रिया सुरू झली आहे. पुढील आठवडय़ात एका उच्चस्तरीय बैठकीदरम्यान यासंबंधीची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या तिन्ही संरक्षण दलांकडून रॉकेट फोर्स तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत लवकरच प्रलय क्षेपणास्त्र तैनात होण्याची शक्यता आहे.
जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम
जनरल बिपिन रावत हे रॉकेट फोर्स स्थापन करण्याच्या दिशेने काम करत होते अशी माहिती नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरि कुमार यांनी अलिकडेच दिली होती. प्रलय क्षेपणास्त्रात सॉलिड प्रोपेलेंटयुक्त रॉकेट मोटरचा अंतर्भाव आहे. तसेच यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. क्षेपणास्त्राच्या गायडेन्स सिस्टीममध्ये स्टेट-ऑफ-द-आर्ट नेव्हिगेशन अँड इंटिग्रेटेड एव्हियोनिक्सचा समावेश आहे. प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्वासी क्षेपणास्त्र आहे.
रात्रीच्यावेळी हल्ला करण्यास सक्षम
डीआरडीओने अद्याप प्रलयायच वेगाबद्दल खुलासा केलेला नाही. परंतु हे क्षेपणास्त्र रात्रीच्यावेळीही शत्रूला लक्ष्य करण्यास सक्षम आहे. चीनकडे अशाप्रकारचे डोंगफेंग 12 क्षेपणास्त्र आहे. तर पाकिस्तानकडे गजनवी, एम-11 आणि शाहीन क्षेपणास्त्र आहे. गजनवी, एम-11 ही क्षेपणास्त्रs पाकिस्तानला चीनकडून मिळाली आहेत. गजनवीचा मारक पल्ला 320 किलोमीटर, एम-11 चा 350 किलोमीटर आणि शाहीनचा मारक पल्ला 750 किलोमीटर इतका आहे.
प्रलय अधिक घातक
प्रलय क्षेपणास्त्राचा उल्लेख डीआरडीओने सर्वप्रथम 2015 मध्ये केला होता. या क्षेपणास्त्राची अचूकता चीनच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांइतकीच आहे. प्रलय क्षेपणास्त्र जमिनीसोबत कनस्टरद्वारेही डागता येऊ शकते. प्रलय क्षेपणास्त्र अन्य कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या तुलनेत अधिक घातक असल्याचे सांगण्यात येत आहे.