३० सरपंच पदांवर महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी
सेनापती कापशी- प्रतिनिधी
कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. या टप्प्यात निवडणुका लागलेल्या एकूण ४६ पैकी २१ लोकनियुक्त सरपंच राष्ट्रवादीचे झाले आहेत. एकूणच महाविकास आघाडीनेही या निवडणुकीत मोठे यश मिळविले आहे. ४६ पैकी तब्बल ३० ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे लोकनियुक्त सरपंच झाले आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
कागल तालुक्यातील जैन्याळ, नंद्याळ, फराकटेवाडी, पिराचीवाडी, बोळावी, बाळेघोल, सेनापती कापशी, चिमगाव, अवचितवाडी आणि ठाणेवाडी या दहा ठिकाणी राष्ट्रवादीचे सरपंच झाले आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव- कौलगे जिल्हा परिषद मतदार संघात जखेवाडी, बेकनाळ, कडगाव या तीन गावांमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच झाले आहेत. तर गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे येथे डॉ. प्रकाश शहापूरकर आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची बिनविरोध निवड आधीच झाली आहे.
भैया माने म्हणाले, आजरा तालुक्यातील उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघात धामणे, भादवनवाडी, वडकशिवाले, मडिलगे, पेंढारवाडी, बहिरेवाडी, मासेवाडी, सोहाळे या आठ गावांमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच झाले आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीने मोठे यश मिळविले आहे. ४६ पैकी तब्बल ३० ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. कागलमध्ये शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाच्या माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाचे व्हनाळीसह बेलेवाडी काळम्मा, हसुर बुद्रुक, आजऱ्यात भादवणमध्ये या चार गावांमध्ये सरपंच झाले आहेत. कडगाव -गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाच्या माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाने करंबळी ग्रामपंचायतची सत्ता ताब्यात घेतली आहे.
उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघात उत्तुर ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद काँग्रेसने मिळविले आहे. भादवण ग्रामपंचायतचे सरपंचपद शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाला मिळाले. होन्याळीमध्ये स्थानिक आघाडीला सत्ता मिळाली आहे.
नविद मुश्रीफ म्हणाले, बोरवडे, करड्याळ व मुगळी व या तीन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच गट विरोधी गटांकडे व बहुमत मुश्रीफ गटाकडे आले. या मतदारसंघात एकूण ४३२ सदस्यपदांच्या जागांसाठी लढती झाल्या. त्यापैकी राष्ट्रवादीला २०९ जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष माजी आमदार संजयबाबा घाटगे गट-४७, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष खासदार संजय मंडलिक गट-४६, भाजपा- ९९, राष्ट्रीय काँग्रेस – आठ, शेतकरी संघटना-०३, अनिल पाटील गट -एक, जनता दल- एक, डॉ. प्रकाश शहापूरकर गट-सहा. स्थानिक आघाडी-१२ असे बलाबल आहे.
यावेळी विकास पाटील, रमेश तोडकर, नितीन दिंडे, ऍड संग्राम गुरव, दत्ता पाटील- सिद्धनेर्लीकर, दत्ता पाटील- केनवडेकर, कृष्णात मेटिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.