प्रतिनिधी /बेळगाव
म. ए. समितीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी दडपशाहीचे धोरण राबवून ताब्यात घेतले. पोलिसांनी सर्व नेत्यांना ताब्यात घेत एपीएमसी व माळमाऊती पोलीस स्थानकात स्थानबद्ध केले. त्यामुळे संतप्त नेत्यांनी पोलीस स्थानकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले. यामुळे सीमाभागात पोलिसांच्या दडपशाहीविरोधात संतापाची लाट उसळली होती.
सोमवारी सकाळी घालण्यात आलेला मंडप पोलिसांच्या आदेशानुसार काढण्यात आला. त्यामुळे जाब विचारण्यासाठी गेलेल्या समिती नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेऊन दिवसभर स्थानकात स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांनी जरी ताब्यात घेतले तरी पोलीस स्थानकात उपोषण करून तेथे नेत्यांनी आपला निषेध व्यक्त केला.
मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके,
अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. शाम पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, सुनील बोकडे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हणमंत मजुकर, मोतेश बार्देशकर, आर. आय. पाटील, प्रवीण रेडेकर, माऊती मंगणाकर यांना ताब्यात घेऊन माळमारुती पोलीस स्थानक, कृषी भवन व एपीएमसी पोलीस स्थानकात स्थानबद्ध करण्यात आले होते.
महिला कार्यकर्त्यांनाही घेतले ताब्यात
व्हॅक्सिन डेपो येथे आलेल्या म. ए. समिती महिला आघाडीच्या सदस्यांनाही पोलिसांनी दमदाटी करत ताब्यात घेतले. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, शिवानी पाटील, रुपा नावगेकर, कल्पना सुतार यांसह इतर महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कॅम्प येथील महिला पोलीस स्थानकात स्थानबद्ध केले. त्यामुळे पोलिसांच्या दडपशाहीचा महिलांनाही सामना करावा लागला.









