वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन (बार्बाडोस)
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे झालेल्या चौथ्या सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने यजमान विंडीजचा 49 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंड संघातील गोलंदाज लॉरेन बेलने 4 गडी बाद केले.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकात 8 बाद 131 धावा जमविल्या. या सामन्यात 11 व्या षटकाअखेर इंग्लंडची स्थिती 2 बाद 73 अशी होती. त्यामुळे हा संघ 170 धावांपर्यंत मजल मारेल असे वाटत होते. पण विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचे 3 फलंदाज एकाही धावाची भर न घालताना 4 चेंडूमध्ये तंबूत परतले. डंक्ले, बाऊचर आणि नाईट यांना विंडीजच्या प्रेसरने बाद केले. त्यावेळी इंग्लंची स्थिती 6 बाद 82 अशी होती. ब्रंट आणि डिन यांनी नवव्या गडय़ासाठी 44 धावांची भागिदारी केल्याने इंग्लंडला 131 धावांपर्यंत मजल मारता आली. ब्रंटने 24 धावा जमविल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजचे 2 फलंदाज ऍलेनी आणि विलियम्स हे पहिल्या षटकात बाद झाले. त्यानंतर मॅथ्यूज आणि कॅपबेल यांनी तिसऱया गडय़ासाठी 4.3 षटकात 40 धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या डीन आणि इक्लेस्टोन यांनी आपल्या गोलंदाजीवर विंडीजचे आणखी 3 फलंदाज बाद केले. इंग्लंडच्या बेलने 4 गडी बाद केले. विंडीजचा डाव 83 धावात आटोपल्याने इंग्लंडने हा सामना 49 धावांनी जिंकला.









